बोगस शिक्षक भरतीप्रकरणी ७३ जणांची सेवा समाप्त

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
बीड
beed fake teacher recruitment case
बीड जिल्ह्यातील कथित बोगस शिक्षक भरतीप्रकरणी शिक्षण विभागाने मोठी कारवाई करत ७३ शिक्षकांची सेवा समाप्त केली आहे. बनावट पदांची निर्मिती करून नियुक्ती मिळवल्याचा आरोप असलेल्या या शिक्षकांवर झालेल्या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता असून, पुढील टप्प्यात आणखी २,२१७ शिक्षकांवर कारवाई होऊ शकते, असा दावा तक्रारदार सादेक इनामदार यांनी केला आहे.



राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतानाही काही ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशांचा सोयीस्कर अर्थ लावून संबंधित नियुक्त्या दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. काही शाळांमध्ये संच मान्यतेत बदल करण्याच्या नावाखाली मंजूर शिक्षक पदांची संख्या वाढवण्यात आल्याचा आरोप आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांची बनावट संख्या दाखवून संच मान्यतेतील पदे वाढवण्यात आल्याचेही समोर आले आहे. या प्रक्रियेत इतर बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची माहितीही तक्रारीतून पुढे आली आहे.

बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी या कथित गैरव्यवहाराविरोधात तक्रार दाखल करून प्रकरणाचा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर शिक्षण विभागाने ७३ शिक्षकांची सेवा समाप्त केल्याची माहिती इनामदार यांनी दिली. याप्रकरणी आणखी २,२१७ शिक्षकांच्या नियुक्त्याही संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे या शिक्षकांबाबत शिक्षण विभाग पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पाणीटंचाईचे संकटही गंभीर झाले आहे. गावागावांत तसेच वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नांतून मेहकरी धरणातून दररोज १५० टँकरद्वारे तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.

पाणी भरण्यासाठी मेहकरी धरण परिसरात टँकरच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र आहे. दररोज मोठ्या संख्येने टँकर धरणावर दाखल होत असून, त्यांच्यामार्फत गावांपर्यंत पाणी पोहोचवले जात आहे. टँकरच्या या रांगांमधून आष्टी तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट होत आहे. एकीकडे कथित बोगस शिक्षक भरतीप्रकरणी कारवाईचा मुद्दा चर्चेत असताना दुसरीकडे पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ तालुक्यातील नागरिकांवर आली आहे.