नवी दिल्ली,
bhavika-ahire आगामी आयसीसी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२७ च्या पार्श्वभूमीवर भारतीय युवा महिला संघाच्या तयारीला वेग आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंग्लंडच्या १९ वर्षांखालील महिला संघाविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत १८ वर्षीय भाविका अहिरे हिच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून अनादी तागडे उपकर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करणार आहे.

बीसीसीआयच्या महिला निवड समितीने शनिवारी या संघाची घोषणा केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. वडोदरा आणि सुरत या दोन शहरांमध्ये सर्व सामने आयोजित करण्यात आले आहेत. कर्णधार भाविका अहिरे हिच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारीही असेल. तिच्यासोबत श्रेया एस. चव्हाण हिची दुसरी यष्टीरक्षक म्हणून संघात निवड करण्यात आली आहे. या संघात इरा जाधव, निधी महातो, पूर्वा सिवाच, महक नरवासे, मैत्री मनियार, ईश्वरी अवसरे आणि दिया यादव यांच्यासह अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तसेच कुमारी, कुमारी, कुमारी, कुमारी, श्रेया परमार आणि पलक सिंग यांचाही संघात समावेश आहे.
आगामी १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक जानेवारी २०२७ मध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धची मालिका भारतीय खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेतून खेळाडूंचा सध्याचा फॉर्म, कामगिरी आणि संघातील समन्वय तपासण्याची संधी मिळणार आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला आपली ताकद आणि कमकुवत बाजू ओळखण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरेल.
मालिकेतील पहिला सामना २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता वडोदरा येथे होईल. दुसरा सामना २८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता याच मैदानावर खेळवण्यात येईल. त्यानंतर मालिकेचे उर्वरित तीन सामने सुरत येथे होतील. १ आणि ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता, तर ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पाचवा आणि अंतिम सामना खेळला जाईल. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. विशेषतः कर्णधार भाविका अहिरे आणि उपकर्णधार अनादी तागडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.