तिरोड्यात तोतया पत्रकारासह एकावर गुन्हा दाखल

खंडणी न दिल्याने सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
तिरोडा,
fake-journalist-in-tiroda स्वतःला पत्रकार असल्याचे सांगून दुचाकी शोरूमच्या स्व्हिहस मॅनेजरकडे चार हजार रुपयांची खंडणीची मागणी करणे व पैसे न दिल्याने बदनामीकारक व्हिडीओ प्रसारीत केल्याप्रकरणी एका तोतया पत्रकारासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर गभणे (रा. एकोडी) असे आरोपीचे नाव आहे.
 
 
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, समीर गभणे याने ५ नोव्हेंबर रोजी आपली दुचाकी दुरुस्तीसाठी येथील श्री श्याम ऑटोमोबाईल येथे आणली होती. दुरुस्तीनंतर बिलाची अंतिम तपासणी करताना पार्ट कोडमध्ये तफावत आढळल्याने शोरूम व्यवस्थापनाकडून बिलात दुरुस्ती करून अतिरिक्त रक्कम परत करण्यात आली. मात्र, समीरने दोन्ही बिले स्वतःकडे ठेवून साथीदाराच्या मदतीने शोरूममध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले. स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत शोरूम बंद पाडण्याची धमकी दिली. दरम्यान, १२ नोव्हेंबर रोजी शोरूममध्ये येऊन चार हजार रुपयांची मागणी केली.
 
 
तर पैसे न दिल्यास शोरूमची बदनामी करण्याची धमकी दिली. मात्र, शोरूमच्या व्यवस्थापकांनी पैसे न दिल्याने १३ नोव्हेंबर रोजी फेसबुक व इन्स्टाग्रामवर बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केले. त्यातच १७ नोव्हेंबर रोजी पुन्हा चार हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी शोरूमचे स्व्हिहस मॅनेजर यांनी २० नोव्हेंबर रोजी तिरोडा पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत संबंधित व्यक्ती तोतया पत्रकार असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तक्रारीच्या आधारे तिरोडा पोलिसांनी आरोपी समीर गभणे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८(३), ३५६(२), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक दलस पाटील करीत आहेत.