वर्धा,
college-staff-68-months-salary-pendingबापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल ६८ महिन्यांचे वेतन थकीत! घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळीही वेतनाविना गेली. आधीच आर्थिक संकटाने कंबरडे मोडले असताना, आता हक्काचे वेतन मागितल्यावर अपमानास्पद वागणूक, मानसिक त्रास आणि नोकरीवरून बरखास्त करण्याच्या धमक्या मिळत असल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.
पोटासाठी काम करायचे, वेतनासाठी विनवण्या करायच्या आणि वर नोकरी जाण्याची भीतीही सहन करायची, ही कसली व्यवस्था? नियमित काम करूनही महिनोंमहिने वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची आणि आर्थिक विवंचनेची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांशी घालून-पाडून बोलणे आणि सेवेतून बरखास्त करू, अशा आशयाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या कथित छळाविरोधात समस्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १९ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम पोलिसांकडे लेखी तक्रार देऊन चौकशी व आवश्यक कार्यवाहीची मागणी केली आहे.
६८ महिन्यांचे वेतन थकीत असताना कर्मचाऱ्यांच्या वेदना कोण समजून घेणार? हक्काचे वेतन मागणे हा गुन्हा आहे का? कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांना आता तरी व्यवस्थापन आणि प्रशासन उत्तर देणार का, हा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.