पैशांचे आमिष दाखवून तरुणाची फसवणूक

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
चंद्रपूर,
deception-of-a-young-man पैशांची निकड आणि आर्थिक अडचणीचा फायदा घेत तरुणाला आमिषाच्या जाळ्यात ओढून त्याच्या नावाचे बँक खाते, एटीएम कार्ड आणि सिमकार्ड ताब्यात घेत मोठे आर्थिक व्यवहार करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
 
 
तक्रारदार किशोर भावे (रा. चांदापूर, ता. मूल) हे गेल्या दीड वर्षापासून पडोली परिसरातील फ्लिपकार्ट डिलिव्हरी आउटलेटमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. दरम्यान, त्यांच्यासोबत काम करणारा लखन भोयर याने पैशांची अडचण असल्यास ओळखीच्या व्यक्तीला स्वतःचे खाते उघडून वापरण्यास दिल्यास चांगले पैसे मिळतील, असे किशोर यांना सांगितले. दुसर्‍या दिवशी लखनने किशोर यांची योगेश मिरानी याच्याशी ओळख करून दिली. खाते वापरण्यास दिल्यास 5 हजार रुपये आणि खाते उघडण्याचा खर्च देण्याचे आमिष योगेशने दाखवले. आर्थिक गरजेपोटी किशोर यास तयार झाले.
 
 
मार्च 2026 मध्ये किशोर आणि योगेश हे दोघे मूल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत गेले आणि किशोर यांच्या कागदपत्रांच्या आधारे खाते उघडण्यात आले. त्यानंतर किशोर यांनी बँकेचे पासबुक, एटीएम तसेच नवे घेतलेले जिओ कंपनीचे सिमकार्ड योगेशच्या ताब्यात दिले. त्या बदल्यात योगेशने त्यांना तात्काळ 3 हजार 500 रुपये दिले. त्यानंतर जुलै महिन्यात किशोर यांना मूल येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून फोन आला आणि खात्यात सुमारे 1 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार झाल्याचे सांगून बँकेत बोलावण्यात आले. बँक व्यवस्थापकाशी विचारणा केल्यानंतर खात्यात संशयास्पद व फसवणुकीचे व्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर किशोर यांनी संबंधित खाते व एटीएम बंद करण्यास सांगितले.
 
 
मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा पैशांची गरज भासल्याने किशोर हे कागदपत्रे घेऊन योगेश मिरानी याला भेटले. योगेश त्यांना यश मोबाईल शॉपमध्ये घेऊन गेला आणि त्यांच्या कागदपत्रांवरून व तपशिलावरून एअरटेल पेमेंट बँकेचे एटीएमसदृश कार्ड, पासबुक व सिमकार्ड तयार करून घेतले. दोन दिवसांत पैसे देण्याचे सांगून योगेशने हे सर्व साहित्य स्वतःकडे ठेवून घेतले. बरेच दिवस पैसे न मिळाल्याने विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. पुढे काही दिवसांतच एअरटेल पेमेंट बँकेच्या कार्ड, पासबुक आणि सिमकार्डचाही गैरवापर होत असल्याचे किशोर यांच्या लक्षात आले.
 
 
महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि एअरटेल पेमेंट बँकेच्या खात्यांचा गैरवापर करून आपली फसवणूक केल्याचे तसेच इतरांनाही पैशांचे आमिष दाखवून अशाच प्रकारे खाती उघडण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर किशोर भावे यांनी 20 नोव्हेंबर 2026 रोजी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी योगेश मिरानीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.