श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरच्या विकासकामास प्रारंभ

प्रसाद व निवास व्यवस्था तात्पुरती राहणार बंद

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
कारंजा लाड,
shri-nrusimha-saraswati-swami-maharaj-temple भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानच्या विकासकामांना गती मिळाली असून, या कामासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री आणि जागेची कमतरता यासाठी संस्थान प्रशासनाने भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
 
 
shri-nrusimha-saraswati-swami-maharaj-temple
 
महाराष्ट्र शासनाने विकास आराखड्यांतर्गत संस्थानला भरघोस निधी उपलब्ध करून दिल्यामुळे संस्थानच्या कायापालटाच्या भव्य आणि दिव्य कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, कामाचे स्वरूप मोठे असल्याने यासाठी यंत्रसामग्रीने काम करणे अनिवार्य आहे. तसेच यंत्रसामग्री वापरण्यास जागा अपुरी असल्याने काही अप्रिय निर्णय घेण्याची वेळ संस्थान प्रशासनावर आली असल्याचे आवाहनात नमूद करण्यात आले आहे. विकासकामे पूर्ण होईपर्यंत प्रसाद व निवास व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांची गैरसोय होणार आहे.
 
 
नित्यपूजा व दैनंदिन धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना शाश्वत पूजेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रसाद पोस्टाने पाठविण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविकांना श्रींचे दर्शन घेता यावे, यासाठी संस्थानच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू श्रीगुरुमाऊली डॉट कॉम या संकेतस्थळावर तसेच यूट्यूब वाहिनीवर थेट दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानच्या भव्य विकासकामांना भाविकांच्या मोलाच्या सहकार्याची आवश्यकता असून, यासाठी विकास निधी अंतर्गत निधी संकलन सुरू करण्यात आले आहे. सर्व गुरुभक्तांनी सढळ हाताने आर्थिक मदत करून या विकासकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थानच्या समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.