अहमदाबाद
diljit dosanjh पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या ‘ऑरा इंडिया टूर २०२६’मुळे चर्चेत आहे. ३० ऑक्टोबर रोजी दिल्ली येथून त्याने या संगीत दौऱ्याची सुरुवात केली होती. त्यानंतर १५ नोव्हेंबर रोजी इंदूरमध्ये त्याचा कार्यक्रम पार पडला. मात्र, इंदूरमधील कार्यक्रमापूर्वीच नशा आणि शस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन देणारी गाणी सादर करू नयेत, अशी मागणी करत जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी आयोजकांना नोटीस बजावली होती. आता २१ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या त्याच्या कार्यक्रमाभोवतीही नवा वाद निर्माण झाला आहे. एका प्राध्यापकाने दिलजीतच्या गाण्यांवर आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, कार्यक्रमापूर्वी सोशल मीडिया आणि ई-मेलच्या माध्यमातून बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्याने अहमदाबाद पोलिसांनी सुरक्षेची विशेष व्यवस्था केली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियम आणि परिसरात १३०० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दिलजीत दोसांझचा २१ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर चंदीगडमधील एका सरकारी महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. पंडितराव धरेनावर यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी अहमदाबाद जिल्हा बालसंरक्षण विभागाला पत्र पाठवून कार्यक्रमातील गाण्यांच्या आशयाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांची तक्रार पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत मोटेरा पोलीस ठाण्याकडे पाठवण्यात आली. गुरुवारी सायंकाळी मोटेरा पोलिसांनी धरेनावर यांचा अधिकृत जबाब नोंदवून घेतला. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दिलजीतच्या कार्यक्रमात दारू, अमली पदार्थ आणि शस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन देणारी गाणी सादर केली जाऊ नयेत, अशी धरेनावर यांची प्रमुख मागणी आहे. ‘पटियाला पेग’ आणि ‘५ तारा’ यांसह एकूण चार गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यक्रमातील सादरीकरण निर्धारित नियम आणि निर्बंधांच्या चौकटीत व्हावे, असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, पगडी परिधान करून अशा प्रकारची गाणी सादर केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात, असा आक्षेपही त्यांनी नोंदवला आहे.
दिलजीतच्या स्टेजवरील वेशभूषेचाही धरेनावर यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. गायकाकडून वापरण्यात येणाऱ्या बुलेट बेल्टमुळे शस्त्रसंस्कृतीला प्रोत्साहन मिळते, असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान स्टेजवरील पोशाखाचा भाग म्हणून बुलेट बेल्टचा वापर करू नये, अशी विनंती त्यांनी दिलजीतला केली आहे.
कार्यक्रमात लहान मुलांना स्टेजवर बोलावण्यावरही निर्बंध असावेत, अशी मागणी धरेनावर यांनी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, १२० डेसिबलपेक्षा अधिक आवाज आणि लेझर लाइट्सचा मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर तसेच डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी त्यांनी २०१९ मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. या आदेशातील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी संपूर्ण देशात व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. कार्यक्रमादरम्यान या अटींचे उल्लंघन झाल्यास गुजरात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यापूर्वी त्यांच्या तक्रारीनंतर इंदूरमधील दिलजीतच्या कार्यक्रमासाठीही चार गाण्यांवर बंदी घालण्याची मागणी करत महिला व बालविकास विभागाने आयोजकांना नोटीस बजावली होती.
दरम्यान, अहमदाबादमधील कार्यक्रमाला बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्याने पोलिसांसमोर सुरक्षेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सोशल मीडिया आणि ई-मेलच्या माध्यमातून धमकीचे संदेश मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. स्टेडियमच्या बाहेरील रस्त्यांपासून ते कार्यक्रमाच्या स्टेज परिसरापर्यंत १३०० हून अधिक पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात असतील. प्रेक्षकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी स्टेजजवळील उभे राहून कार्यक्रम पाहण्याच्या विभागातही अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक तसेच श्वानपथक कार्यक्रम सुरू होण्यापासून संपेपर्यंत संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवणार आहे. पार्किंगची जागा, प्रवेशद्वारे आणि स्टेडियमच्या प्रत्येक भागाची नियमित तपासणी केली जाणार आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
संपूर्ण परिसरावर ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. धमकीचे ई-मेल पाठवणाऱ्यांचा तसेच संशयास्पद सोशल मीडिया खात्यांचा शोध घेण्यासाठी सायबर गुन्हे शाखाही सक्रिय झाली आहे. गर्दीमध्ये साध्या वेशातील पोलिस कर्मचारी तैनात राहणार असून, मोबाईल चोरी आणि तिकिटांची काळ्या बाजारातील विक्री रोखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असेल. महिला प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी ‘शी टीम’ या विशेष महिला पोलीस पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. हे पथक साध्या वेशात संपूर्ण कार्यक्रमस्थळी गस्त घालणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रेक्षकांना स्टेडियममध्ये केवळ मोबाईल फोन नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बॅग, पॉवर बँक, पाण्याच्या बाटल्या, होर्डिंग आणि काठ्या किंवा दांडके अशा वस्तू नेण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दिलजीत दोसांझच्या अहमदाबादमधील कार्यक्रमाकडे आता केवळ चाहत्यांचेच नव्हे, तर प्रशासनाचेही लक्ष लागले आहे. एकीकडे गाण्यांवरून निर्माण झालेला वाद आणि दुसरीकडे बॉम्बस्फोटाच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम कडेकोट सुरक्षेत पार पडणार आहे.