ईडीच्या अधिकारांवरून कायदेशीर लढाई पुन्हा सुरू

पुनर्विलोकन याचिकांवर जानेवारीत सुनावणी : सर्वोच्च न्यायालय

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ed-powers-review-2027मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकार कायम ठेवणाऱ्या २०२२ च्या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी दाखल याचिकांवर जानेवारी २०२७ मध्ये सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सहमती दर्शवली आहे. या अधिकारांनुसार, ईडीला मनी लाँडरिंगच्या प्रकरणांमध्ये अटक करणे, मालमत्ता जप्त करणे आणि शोधमोहीम राबवून वस्तू जप्त करण्याचे अधिकार आहेत. हे सर्व अधिकार मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रदान करण्यात आले आहेत.
 

ED 
हे प्रकरण सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या न्यायासनासमाेर आले. या प्रकरणात हजर असलेल्या वकिलांनी न्यायासनाला शक्य तितक्या लवकर सुनावणीची तारीख निश्चित करण्याची विनंती केली. यावर न्यायासनाने उत्तर दिले की, आम्ही जानेवारीमध्ये सुनावणी घेऊ शकतो. सुनावणीची तारीख अधिसूचित केली जाईल.
गतवर्षी ३१ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, अंमलबजावणी संचालनालयाने तीन प्राथमिक मुद्दे उपस्थित केले आहेत. हे मुद्दे प्रामुख्याने पुनर्विलोकन याचिकांच्या स्वीकारार्हतेशी संबंधित आहेत. पुनर्विलोकन याचिकाकर्त्यांनी विचारासाठी १३ प्रश्न उपस्थित केले आहेत़ हे मुद्दे पुनर्विलोकन याचिकांशी संबंधित असल्याने या याचिकांवर पुनर्विचार करता येईल का, यावर आम्ही प्रथम सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊ. त्यानंतर, पुनर्विलोकन याचिकाकर्ते उपस्थित करू इच्छिणारे प्रस्तावित प्रश्न आम्ही ऐकून घेऊ, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दाेन मुद्यांवर केंद्र सरकारचा युक्तिवाद
केंद्र सरकारने म्हटले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिलेल्या दोन विशिष्ट मुद्यांपलीकडे पुनर्विलोकन याचिकांवर सुनावणी होऊ शकत नाही. न्यायासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये या याचिकांवर नोटिसा जारी केल्या होत्या. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, त्यावेळी पुनर्विलोकन याचिकांवर प्राथमिक सुनावणी घेणाऱ्या न्यायासनाने केवळ दोन मुद्यांवर नोटिसा जारी केल्या होत्या. पहिला मुद्दा आरोपीला ईसीआयआरची प्रत देण्यासंबंधी होता. दुसरा मुद्दा मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम २४ अंतर्गत आरोपीवर पुरावा सादर करण्याची जबाबदारी टाकण्यासंबंधी होता.