सँडपेपर प्रकरणाचा फटका; वॉर्नर-ख्वाजा OUT!

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
सिडनी,
fallout-from-the-sandpaper-incident ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील २०१८ च्या बहुचर्चित सँडपेपर प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या जुन्या वादावर नव्याने झालेल्या खुलाशांचा फटका माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर यांना बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी समालोचक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या या दोघांना फॉक्स स्पोर्ट्सने आपल्या प्रसारण पॅनेलमधून तात्पुरते दूर केले आहे.
 
fallout-from-the-sandpaper-incident
 
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ मध्ये केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले होते. या घटनेला 'सँडपेपरगेट' म्हणून ओळखले जाते. अलीकडेच प्रकाशित झालेल्या आत्मचरित्रात उस्मान ख्वाजा याने या प्रकरणाबाबत महत्त्वपूर्ण दावा केला. चेंडूशी छेडछाड करण्याच्या योजनेची माहिती ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला होती, असे त्याने म्हटले आहे. ख्वाजाच्या या विधानामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून, डेव्हिड वॉर्नरनेही त्याच्या दाव्यांना पाठिंबा दिला आहे.
 
या प्रकरणाच्या तत्कालीन चौकशीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि चेंडूवर सँडपेपर वापरणारा कॅमेरॉन बँक्रॉफ्ट यांना दोषी ठरवले होते. मात्र, ख्वाजाच्या नव्या दाव्यामुळे या प्रकरणातील जुन्या घटनांवर पुन्हा प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
 
या वादाची चर्चा सध्याचा ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्स याच्यापर्यंतही पोहोचली आहे. या घटनेची माहिती नसल्याचे कमिन्सने सांगितले होते. मात्र, ख्वाजा, वॉर्नर आणि बँक्रॉफ्ट यांच्या विधानांमुळे त्याच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू झाली. पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी कमिन्सच्या नेतृत्वाबाबतही तर्कवितर्क लावले जात होते. या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मंडळाने त्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
 
दरम्यान, फॉक्स स्पोर्ट्सच्या समालोचन पॅनेलमध्ये असलेल्या ख्वाजा आणि वॉर्नर यांना सध्याच्या वादामुळे पुढील काही आठवड्यांसाठी प्रसारणाच्या जबाबदारीतून बाजूला करण्यात आले आहे. त्यांचे समालोचनात पुनरागमन नेमके कधी होणार, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.
 
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर डिसेंबर-जानेवारीदरम्यान ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या महत्त्वाच्या क्रिकेट मालिकांपूर्वी सँडपेपर प्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील वातावरण तापले आहे.