नामांकित हॉटेल्सवर एफडीएचा छापा

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
पाचगणी
fda raid
महाबळेश्वरमधील कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आता पाचगणीतील हॉटेल व्यावसायिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पाचगणीमधील पाच नामांकित हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने अचानक छापे टाकत तपासणी केली. या कारवाईत काही हॉटेल्समध्ये अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक तसेच मुदत संपलेले खाद्यपदार्थ आढळून आले. याप्रकरणी दोन हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित करण्यात आले असून, अन्य तीन हॉटेल्सना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या अचानक झालेल्या कारवाईमुळे पाचगणीतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



सातारा येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष तपासणी मोहीम राबवली. यावेळी हॉटेलमधील रेस्टॉरंट, स्वयंपाकघर आणि अन्नपदार्थ साठवण्याच्या ठिकाणांची सखोल पाहणी करण्यात आली. खाद्यपदार्थांची गुणवत्ता, त्यांची साठवणूक करण्याची पद्धत, स्वयंपाकघरातील स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन केले जात आहे की नाही, याची अधिकाऱ्यांनी बारकाईने पडताळणी केली. या तपासणीत दोन हॉटेल्समध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने त्यांच्याविरोधात परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली.

शॉपिंग सेंटर परिसरातील राधा कृष्ण फूड कोर्ट आणि खिंगर रोडवरील समर प्लाझा या दोन हॉटेल्समध्ये तपासणीदरम्यान मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा आढळून आला. याशिवाय स्वच्छतेच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाने दोन्ही हॉटेल्सचे अन्न विक्री परवाने निश्चित कालावधीसाठी निलंबित केले आहेत.

या मोहिमेत अन्य तीन हॉटेल्सचीही तपासणी करण्यात आली. नारायण लॉज परिसरातील क्लिफ इन, खिंगर रोडवरील ब्लू कंट्री आणि शॉपिंग सेंटरमधील फ्रेंच ट्रीट या हॉटेल्समध्ये स्वच्छतेसंदर्भात अनियमितता आढळून आली. त्यामुळे संबंधित हॉटेल व्यवस्थापनांना अन्न व औषध प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी प्रशासनाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

या विशेष तपासणी पथकामध्ये अधिकारी पी. एन. वायकर, ए. ए. गायकवाड आणि सायली खपाने यांच्यासह विभागातील अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. पर्यटनस्थळांवर मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.