मुंबई
filmmaker anubhav sinha चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते अनुभव सिन्हा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील प्रेम गोविंद सिन्हा यांचे १९ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता मुंबईत निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता वर्सोवा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. २१ नोव्हेंबर रोजी सकाळी अनुभव सिन्हा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिती दिली. या पोस्टमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत वडिलांना श्रद्धांजली वाहिली.

वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी अनुभव सिन्हा यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला. त्यासोबत लिहिलेल्या भावूक संदेशातून वडिलांच्या जाण्याने घरात निर्माण झालेली पोकळी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे घर अचानक मोठे आणि रिकामे वाटू लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. रोजच्या आयुष्यातील वडिलांशी संबंधित छोट्या छोट्या गोष्टी आता आठवणींचा भाग झाल्या आहेत, अशी भावना त्यांच्या पोस्टमधून व्यक्त झाली.अनुभव सिन्हा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘अचानक असे झाले की घर मोठे आणि रिकामे वाटू लागले. अचानक असे झाले की आता त्यांच्यासोबत कोणताही नवा फोटो काढता येणार नाही. अचानक असे झाले की आता त्यांच्यासाठी नवीन मिठाई शोधणेही बंद होईल. बाकी सर्व काही तसेच राहील. त्यांच्यावरचे प्रेम, त्यांच्याशी होणाऱ्या गप्पा... सर्व काही तसेच राहील.’
वडिलांच्या आठवणींशी जोडलेल्या या शब्दांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी प्रतिक्रिया देत अनुभव सिन्हा यांचे सांत्वन केले आहे.
अभिनेत्री दिया मिर्झा, नीना गुप्ता, दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या पत्नी सुतापा सिकदर, मानव विज आणि चित्रपट निर्माते शूजित सरकार यांच्यासह अनेकांनी अनुभव सिन्हा यांच्या पोस्टवर कमेंट करत संवेदना व्यक्त केल्या. या कठीण काळात त्यांनी अनुभव यांना पाठिंबा दिला. लेखक मुश्ताक शेख यांनीही इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून प्रेम गोविंद सिन्हा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या संदेशात लिहिले, ‘रेस्ट इन पीस. तुम्ही नेहमी आमच्या हृदयात राहाल. आमच्या आयुष्यात इतके प्रेम आणल्याबद्दल तुमचे आभार.’
वडिलांच्या आवडत्या गाण्याची आठवणही केली शेअर
अनुभव सिन्हा यांनी आपल्या आई-वडिलांशी संबंधित एक जुना किस्साही सांगितला. त्यांच्या आई त्यांना अनेकदा ही आठवण सांगत असत. लग्नासाठी अनुभव यांचे वडील त्यांच्या आईला भेटायला गेले होते, तेव्हा त्यांना एखादे गाणे म्हणण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी प्रेम गोविंद सिन्हा यांनी आपले आवडते ‘छोटी सी ये जिंदगानी रे’ हे गाणे निवडले होते. वडिलांच्या निधनानंतर अनुभव यांनी ही आठवण शेअर करत त्यांच्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा क्षण पुन्हा एकदा उजाळला.