नवी दिल्ली,
gold-prices-plummet जागतिक बाजारातील विक्रीचा दबाव आणि अमेरिकन डॉलरच्या वाढत्या मजबुतीमुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण सुरू आहे. शुक्रवारीही सोन्याच्या दरात तब्बल ५ हजार २०० रुपयांची घट झाली. विशेष म्हणजे, सोन्याच्या किमतीत सलग नऊ सत्रांपासून घसरण होत असून, अवघ्या नऊ दिवसांत सोने १७ हजार ६०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव शुक्रवारी प्रति १० ग्रॅम १ लाख २९ हजार ३०० रुपयांवर आला. यामध्ये सर्व करांचा समावेश आहे. गुरुवारी हाच दर १ लाख ३४ हजार ५०० रुपये होता. सलग नऊ सत्रांतील घसरणीमुळे सोन्याच्या किमतीत जवळपास १२ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. शनिवार आणि रविवार सराफा बाजार बंद असल्याने या काळात व्यवहार होत नाहीत.
यंदा जानेवारी महिन्याच्या अखेरीस सोन्याने प्रति १० ग्रॅम १ लाख ८३ हजार रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. मात्र, त्यानंतर बाजारातील परिस्थिती बदलल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. आतापर्यंत सोन्याचा भाव विक्रमी स्तरावरून ५३ हजार ७०० रुपयांनी म्हणजेच २९.३ टक्क्यांनी खाली आला आहे. सध्याचा भाव नोव्हेंबर २०२५ मधील पातळीवर पोहोचला आहे.
या घसरणीमागे अमेरिकन डॉलरची वाढती ताकद, सरकारी रोख्यांवरील परताव्यात झालेली वाढ आणि अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ कमोडिटी विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, या आठवड्यात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १.५ टक्क्यांहून अधिक मजबूत झाल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमती आणखी वेगाने घसरल्या.
गुंतवणूक क्षेत्रातील 'लेमन'चे संशोधन प्रमुख गौरव गर्ग यांनीही डॉलरची मजबुती आणि अमेरिकेतील ट्रेझरी बाँड्सवर मिळणारा अधिक परतावा यामुळे सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मौल्यवान धातूंची मागणी कमी झाल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, सोन्याचे दर कमी झाल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, किमती कमी झाल्याचा परिणाम बाजारातील खरेदीवरही दिसून येत आहे. ऑगमॉन्टच्या मुख्य संशोधन अधिकारी रेनिशा चेनानी यांच्या म्हणण्यानुसार, या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाल्याने खरेदीत वाढ झाली आहे. विशेषतः लग्नसराईसाठी दागिने घेण्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबांना या घसरणीचा फायदा होत आहे. मात्र, प्रत्यक्ष बाजारातील सोन्याची मागणी अद्यापही कमकुवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची घसरण कायम आहे. शुक्रवारी स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस ११०.२४ डॉलरने म्हणजेच ३.०४ टक्क्यांनी घसरून ३,५१५.०२ डॉलरवर आला. सलग पाचव्या सत्रातील घसरणीनंतर हा दर सप्टेंबर २०२५ नंतरच्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. जानेवारीमध्ये प्रति औंस ५,५९५.०२ डॉलरचा विक्रमी भाव नोंदवल्यानंतर आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत ३७ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष आणि कमोडिटी व चलन संशोधन विश्लेषक जतीन त्रिवेदी यांनी प्रति औंस ३,५०० डॉलर ही सोन्यासाठी महत्त्वाची आधार पातळी असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात या स्तरावर सोन्याच्या किमती टिकतात की आणखी घसरण होते, याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.