गोल्डी ब्रार मोस्ट वॉन्टेड घोषित

नऊ कोटी रुपयांचे बक्षीसही केले जाहीर

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली,
goldy-brar-fbi-most-wantedअमेरिका आणि कॅनडातील तपास यंत्रणांनी गँगस्टर गोल्डी ब्रारचा शोध तीव्र केला आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) त्याचा 'टॉप १० मोस्ट वॉन्टेड फरारी'च्या यादीत समावेश केला आहे. कॅनडानेही त्याला देशातील २५ मोस्ट वॉन्टेड फरारींमध्ये स्थान दिले आहे. एफबीआयने गोल्डीच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास १० लाख अमेरिकन डॉलर्स (९.२६ कोटी) तर कॅनडात त्याच्यावर २,५०,००० कॅनेडियन डॉलर्सपर्यंतचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
 

goldy brar 
एफबीआयने २८ सप्टेंबरला सतिंदरजीत सिंग उर्फ गोल्डी ब्रारचा आपल्या मोस्ट वॉन्टेड यादीत समावेश केला. या यादीत समाविष्ट होणारा तो ५४३ वा फरारी आहे. अमेरिकन एजन्सीनुसार, ब्रार हा उत्तर अमेरिकेतील लॉरेन्स बिश्नोई संघटित गुन्हेगारी सिंडिकेटचा कथित प्रमुख आहे. या सिंडिकेटवर अमेरिका आणि कॅनडामध्ये अनेक हिंसक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांमध्ये राजकीय आणि धार्मिक व्यक्तींच्या लक्ष्यित हत्या, गोळीबार, खून, अपहरण, खंडणी, हल्ले आणि अमली पदार्थ व शस्त्रास्त्रांची तस्करीचा समावेश आहे.
एफबीआयच्या मते, गोल्डी ब्रारवर अमेरिकेच्या फेडरल कोर्टात अनेक गंभीर आरोप आहेत. यामध्ये संघटित गुन्हेगारी सिंडिकेट चालवण्याचा कट, खंडणीचा कट आणि अमली पदार्थांचे वितरण या गुन्ह्यांचा समावेश आहे. अमेरिकन तपास एजन्सीनुसार, सात जुलैला 'ऑपरेशन हार्डबॉल' अंतर्गत तीन आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी सिंडिकेट्सशी संबंधित ३७ आरोपी व्यक्तींवर आरोप दाखल करण्यात आले. यामध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारशी संबंधित टोळ्यांच्या सदस्यांचा समावेश आहे. बिश्नोई सिंडिकेटचे जाळे अनेक देशांमध्ये पसरलेले आहे. या टोळीवर अमेरिकेत हिंसक कारवाया, खंडणी आणि अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सामील असल्याचाही आरोप आहे.