चंद्रपूर,
sneha-foods-industry-in-chandrapur चंद्रपूरमधील पडोली ते घुग्घूस मार्गावरील एमआयडीसी परिसरातील स्नेहा फुड्स उद्योगावर आयकर विभागाने धाड टाकली असून, तीन पथकाद्वारे तपासणी सुरू आहे. हैदराबादस्थित ‘स्नेहा ग्रुप’वर सुरू असलेल्या देशव्यापी कारवाईचा हा एक भाग असल्याची माहिती आहे. आयकर विभागाने हैदराबाद येथील मुख्य ‘स्नेहा ग्रुप’च्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 16 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी झडती सुरू केली आहे. चंद्रपूरमधील प्रकल्प हा याच समूहाचा भाग आहे. हैदराबाद (कोंडापूर) आणि विजयवाडा येथील कंपनीची कार्यालये तसेच संचालकांच्या निवासस्थानीही आयकर अधिकारी तपासणी करीत आहेत.
मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी आणि आर्थिक व्यवहारांतील अनियमिततेच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात आली आहे. स्नेहा ग्रुप प्रामुख्याने कुक्कुटपालन, पशुखाद्य, खाद्यतेल आणि सोया उत्पादनांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. चंद्रपूर येथील युनिटमध्ये प्रामुख्याने सोयाबीन तेल शुद्धीकरण आणि सोया उत्पादनांचे काम चालते. ही शोधमोहीम अद्याप सुरू असून, आयकर विभागाकडून जप्त केलेली कागदपत्रे, डिजिटल डेटा किंवा नेमक्या किती कोटींची करचुकवेगिरी उघड झाली आहे, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलेले नाही.