ड्रॅगन पॅलेसमध्ये २६ नोव्हेंबरला संविधानाचा जागर; पाच हजार विद्यार्थी करणार उद्देशिकेचे सामूहिक वाचन

वैशाली सामंत, शिवा मोहोड यांच्यासह नामवंत कलाकारांचे बुद्ध-भीम गीतांचे सादरीकरण

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |

नागपूर,
kamthi-constitution-day-world-recordभारतीय संविधान दिनानिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान भव्य संविधान जागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या २६ नोव्हेंबर रोजी पाच हजारांहून अधिक विद्यार्थी एकाच वेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणार आहेत. या उपक्रमाची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
 

kamthi 
कामठी, ग्रामीण भागासह संपूर्ण विदर्भातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात उपस्थित राहून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश देणार आहेत. यासोबतच 'जागतिक संविधान पुस्तक' या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाच्या माध्यमातून आणखी एक विश्वविक्रम करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. या ग्रंथाचे लोकार्पण पुढील वर्षी करण्यात येणार आहे.
 
महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचीही विशेष मेजवानी असणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि गायक स्वत्रील कुमार बनसोड यांच्या कलासमूहाचा बुद्ध-भीम गीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. तर २६ नोव्हेंबर रोजी टी-सीरिज आणि इंडियन आयडॉल फेम गायक शिवा मोहोड तसेच एस. के. फ्युजन म्युझिकल बँड यांचा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे.
 
या तीन दिवसीय महोत्सवासाठी संपूर्ण ड्रॅगन पॅलेस परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात येणार आहे. भाविक, पर्यटक आणि नागरिकांसाठी सुरक्षा व्यवस्था, आवश्यक सुविधा तसेच माहिती कक्ष उभारण्यात येणार आहेत.
 
महोत्सवातील सर्व कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार असून, संविधान दिनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.