विठुरायाच्या चरणी एकनाथ शिंदेंचे साकडे

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
पंढरपूर
vitthal rukmini maha puja
कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक भक्तिभावाने पार पडली. विठुरायाचे मनमोहक रूप आणि पददर्शन घेत भाविक तृप्त होत असतानाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पांडुरंगाच्या चरणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष साकडे घातले. बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी आणि त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे, अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.



राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असून, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतीसमोर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, लवकरात लवकर पाऊस सुरू व्हावा आणि बळीराजाला दिलासा मिळावा, असे साकडे त्यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाचे संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, या शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे या दाम्पत्याला मिळाला. गेल्या अकरा वर्षांपासून हे दाम्पत्य नियमितपणे कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला येत आहे. विठुरायाच्या महापूजेत सहभागी होण्याची इच्छा अनेक वर्षांपासून मनात होती. यंदा पांडुरंगाने ती पूर्ण केल्याने आयुष्यातील हा क्षण अविस्मरणीय ठरल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

महापूजेचा मान मिळाल्यानंतर सुधाकर शिंदे आणि प्रणिता शिंदे यांनी आपला आनंद व्यक्त केला. गेल्या अकरा वर्षांपासून कार्तिकी यात्रेला येत असताना एकदा तरी महापूजेचा मान मिळावा, अशी मनोकामना होती. यंदा पांडुरंगाने आमची इच्छा पूर्ण केली. हा मान मिळाल्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नसल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे शेतकऱ्यांच्या संकटातून मुक्तीसाठी विठुरायाकडे प्रार्थना, तर दुसरीकडे अकरा वर्षांपासून मनात जपलेली महापूजेची इच्छा पूर्ण झाल्याचा भाविकांचा आनंद, अशा भक्तिमय वातावरणात पंढरपूरची कार्तिकी यात्रा आणि शासकीय महापूजा पार पडली.