रत्नागिरी,
konkan-road-accidents-ratnagiriकोकणात अलीकडे पुन्हा एकदा रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी दापोली मंडणगड या राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड येथे एका कारने पादचाऱ्याला उडवल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातात एसटीच्या मागील चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. या मोठ्या अपघातामुळे दापोली व मंडणगड या राज्य महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दापोली शहरातील काळकाईकोंड येथील सुरेंद्र गोरीवले असं अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगडहून दापोलीकडे निघालेल्या एसटी बस आणि दापोलीकडून मंडणगडकडे जाणारा दुचाकीस्वार आमने-सामने येऊन भीषण धडक झाली. दापोली तालुक्यातील खेर्डी येथे एसटी स्टॉपच्या इंगलवाडी येथील दुकानाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळतातच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसंच स्थानिकांनीही तात्काळ मदतकार्य सुरू केले. शनिवारी सकाळी तब्बल तासाभरानंतर दापोली मंडणगड राज्य महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सद्यस्थितीत कोकणात थंडीचा हंगाम व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी आहे. वाहनचालकांनी महामार्ग व राज्यमार्ग, तसेच स्थानिक रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन वेगाचा कोणताही धोका न पत्करता वाहने चालवणे आवश्यक आहे.