उलट्या, चक्कर, श्वास कोंडला अन् थेट मृत्यू!

मद्याच्या विषबाधेतून १६ जणांचा बळी

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
मणिपूर,
manipur-spurious-liquor-16-deathsमणिपूरमधील चंदेल आणि काकचिंग जिल्ह्यांत भेसळयुक्त दारू प्यायल्याचा संशय असून या घटनेत आतापर्यंत किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 370 हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 15 ते 20 नोव्हेंबरदरम्यान ही प्रकरणे समोर आली असून उपचारासाठी अनेक बाधितांना इम्फाळ येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.
 

manipur 
चंदेल जिल्ह्यातील चकपिकरोंग आणि आसपासच्या भागांत तसेच शेजारील काकचिंग जिल्ह्यातील सुग्नू येथे मृत्यू झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. स्थानिक वृत्तांनुसार चंदेल परिसरात 9 जणांचा मृत्यू झाला असून सुग्नू येथे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय मदत घेणाऱ्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. शिजा हॉस्पिटल्स अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये 312 हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. तर बाबिना मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 60 जणांना दाखल करण्यात आले आहे. याशिवाय इम्फाळमधील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांसह अन्य आरोग्य केंद्रांमध्येही रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.
अनेक रुग्णांना उलट्या होणे, पोटदुखी, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवत आहेत. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह यांनी शुक्रवार, 20 नोव्हेंबर रोजी शिजा हॉस्पिटल आणि बाबिना हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेतला आणि उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांची भेट घेतली.