अनिल कांबळे
नागपूर,
rape complaint इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर विवाहित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्या तरुणाने लैंगिक छळ केल्यामुळे त्याच्यावर महिलेने लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तो मध्यवर्ती कारागृहात गेला होता. तरुणाने आता तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला घरात शिरून पतीसमोर धमकी दिली. हा प्रकार वाठोडा परिसरात उघडकीस आला आहे.
‘तुझी केस मागे घे, अन्यथा तुझ्यासोबत यापेक्षाही वाईट करीन,’ अशी धमकी देत आरोपीने महिलेला आणि तिच्या पतीला अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेशमा (३०) असे तक्रारदार महिलेचे नाव असून, अमीर हुसेन (२५, रा. अकोला) असे आरोपीचे नाव आहे. रेशमा ही प्रयोगशाळेत काम करते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशमा यांची २०२५ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अमीर हुसेनशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. २०२६ मध्ये आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीला तुरुंगात जावे लागले होते. दरम्यान, आरोपी पुन्हा बाहेर आल्यानंतर त्याने रेशमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रेशमा घरी असताना आरोपी त्यांच्या घरासमोर आला.rape complaint त्याने जुन्या प्रकरणातील तक्रार मागे घेण्याची मागणी केली. तक्रार मागे न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी रेशमा यांच्या पतीने आरोपीला विरोध केला असता, त्याने दोघांनाही अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने पोलिसांकडे धाव घेतली.
रेशमी यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर आता धमकी आणि दबाव आणल्याच्या आरोपामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील तपास सुरू आहे.