खरगपूर,
kharagpur भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या आयआयटी खरगपूरच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित अमृतमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेतील विविध प्रदर्शनांना भेट देऊन तरुणांशी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांबाबत चर्चा केली. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ७५ वर्षांतील भारताच्या बदलत्या प्रवासाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आयआयटी खरगपूरने आपल्या स्थापनेपासून अनेक महत्त्वपूर्ण टप्पे पार केले आहेत. या काळात देशाने बैलगाड्यांपासून बुलेट ट्रेनपर्यंत, टपाल पत्रांपासून सोशल मीडियापर्यंत मोठे परिवर्तन अनुभवले. भारतातील पहिली आयआयटी असलेल्या खरगपूर संस्थेने या प्रत्येक बदलाच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी त्यांनी संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थितांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला पोहोचण्यास झालेल्या विलंबाबद्दल मोदी यांनी सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली. आयआयटी खरगपूरच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात भारताचे वर्तमान आणि भविष्य एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्थेच्या ७५ वर्षांच्या वाटचालीचा गौरव करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या योगदानाचेही कौतुक केले.
यावेळी मोदी यांनी आयआयटी खरगपूरमधील वसतिगृहांच्या वैशिष्ट्याचाही उल्लेख केला. इतर शैक्षणिक संस्थांमध्ये वसतिगृहे असतात, मात्र आयआयटी खरगपूरमध्ये त्यांना 'हॉल्स' म्हटले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या हॉलचा विशेष अभिमान असतो आणि संस्थेतील या आठवणी आयुष्यभर सोबत राहतात, असे ते म्हणाले.
संस्थेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भाष्य करताना पंतप्रधानांनी येथील नजरकैद शिबिराचाही उल्लेख केला. या ठिकाणी विचारांना बळ मिळाले आणि राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा मिळाली, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात या शिबिरात राहिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या भावना आणि त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असल्याचे मोदी म्हणाले.
दशकांपूर्वी याच ठिकाणी देशासाठी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा उत्साह दिसून आला होता. भारताला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पाहण्याची त्यांची इच्छा होती. आज त्याच परिसरात आयआयटीमधून शिक्षण घेणारे तरुण आपल्या संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने योगदान देत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले.