पाटणा,
modi-nitish-meet-at-the-airport बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभेचे खासदार नितीश कुमार यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे. पाटणा विमानतळावर दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी मोदी आणि नितीश कुमार यांनी एकमेकांचे हसतमुखाने स्वागत करत आपुलकी व्यक्त केली. या भेटीचे छायाचित्र स्वतः पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीची विशेष चर्चा सुरू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर नितीश कुमार यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर करत, पाटणा विमानतळावर नितीश कुमार यांची भेट घेऊन आनंद झाल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार आणि मोदी यांची झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, बिहार दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गंगा नदीवरील 'नितीश सेतू'चे उद्घाटन केले. वैशाली येथे गंगा नदीवर उभारण्यात आलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी ४ हजार २८० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या उद्घाटनामुळे बिहारमधील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.
दरम्यान, एप्रिल २०२६ मध्ये नितीश कुमार यांनी अचानक मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. त्यानंतर भाजपचे नेते सम्राट चौधरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त करत मुख्यमंत्रीपद सोडले होते. त्यानंतर ते राज्यसभेचे खासदार झाले आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले.
नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या त्यांच्या या आनंदी भेटीने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नितीश कुमार हे राज्यसभेचे सदस्य असले तरी बिहारमधील राजकीय घडामोडी आणि विकासकामांमध्ये त्यांचा सहभाग कायम आहे. अलीकडेच त्यांनी पाटणा येथील जनता दल युनायटेडच्या कार्यालयाला भेट दिली होती. तसेच मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे नितीश कुमार यांची पुढील राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.