तरुण भारतच्या बातमीची दखल!

अमृते आखाड्यात सुविधा देण्यासाठी क्रीडा विभागाचे पाऊल; सभापतींची पाहणी

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
प्रणव सातोकर
नागपूर,
nagpur-akhada-facilities-inspectionमहाराष्ट्र केसरी स्पर्धेपूर्वी आखाड्याचे चित्र बदलणार का? निकृष्ट माती आणि खराब साहित्याचा प्रश्न ऐरणीवर; सुविधा न मिळाल्यास पैलवानांचा मनपावर लंगोट मोर्चाचा इशारा.
 

aakhada 
सदर येथील रामराव अमृते आखाड्यातील व्यायामाचे खराब साहित्य आणि निकृष्ट दर्जाच्या मातीचा प्रश्न अखेर नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागापर्यंत पोहोचला आहे. यासंदर्भात ४ ऑक्टोबर रोजी तरुण भारतने आवाज उठवित वृत्त प्रकाशित केले होते. खेळाडूंनी आखाड्यातील गैरसोयी आणि सुविधांच्या अभावाबाबत आपल्या व्यथा तरुण भारतकडे मांडल्या होत्या. या बातमीची दखल घेत गुरुवारी (२० नोव्हेंबर) क्रीडा सभापती दर्शनी धवड आणि क्रीडा अधिकारी पीयूष अंबुलकर यांनी आखाड्याला भेट देत पाहणी केली.
या भेटीदरम्यान आखाड्यातील खराब व्यायाम साहित्य, मातीचा दर्जा आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली. खेळाडूंना नेमक्या कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, याची यादी लिखित स्वरूपात देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या. तसेच आखाड्यातील त्रुटी दूर करून खेळाडूंना योग्य साहित्य आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले.
विशेष म्हणजे, यापूर्वी तरुण भारतच्या प्रिंट आणि डिजिटल माध्यमातून या समस्येला वाचा फोडण्यात आली होती. सुविधा उपलब्ध न झाल्यास नागपूर महानगरपालिकेवर पैलवानांचा 'लंगोट मोर्चा' काढण्याचा इशारा खेळाडूंनी दिला होता. त्यामुळे आता क्रीडा विभागाच्या पाहणीनंतर प्रत्यक्षात किती सुधारणा होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही दिवसांतच नागपूर शहरात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पैलवानांना सरावाच्या योग्य सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत ऐन स्पर्धेच्या तोंडावर आखाड्यातील गैरसोयी दूर करण्यासाठी प्रशासनाने घेतलेली भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ही केवळ आश्वासनपूर्ती ठरते की खरोखरच आखाड्याचे चित्र बदलते, हे येणारा काळच ठरवेल.
लवकर सुविधा न मिळाल्यास लंगोट मोर्चा काढणार : श्रीराम पेंदाम
"क्रीडा सभापती आणि क्रीडा अधिकारी यांनी आखाड्यात येऊन पाहणी केली असून, सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. काही दिवसांतच नागपुरात महाराष्ट्र केसरीची मोठी स्पर्धा होणार आहे. त्यासाठी पैलवानांची तयारी होणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण होतील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही पैलवानांचा लंगोट मोर्चा महानगरपालिकेवर शंभर टक्के काढणार."
श्रीराम पेंदाम, वस्ताद, अमृते व्यायामशाळा
सर्व त्रुटींची माहिती प्रशासनाला दिली : ईशान घोगले
"आखाड्यात असलेल्या सर्व असुविधा आणि त्रुटी आम्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यांनी आम्हाला आवश्यक सुविधांची माहिती लिखित स्वरूपात मागितली आहे. तसेच लवकरात लवकर या सर्व त्रुटींची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे."
— *ईशान घोगले, खेळाडू, अमृते आखाडा, सदर*