नागपूर,
nagpur-heavy-vehicle-entry-ban-2026शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील ५३ निवासी आणि व्यावसायिक भागांमधील निश्चित रस्त्यांवर अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी यासंदर्भात २० नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी केली असून, २१ नोव्हेंबर २०२६ पासून पुढील आदेशापर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
यापूर्वी नागपूर शहरात अवजड वाहनांना सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत प्रवेशबंदी होती. मात्र, शहरातील वाहनांची वाढती संख्या, निवासी भागांमधील अवजड वाहनांची वाहतूक, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, रुग्णालये आणि प्रमुख चौकांमधील वाहतूक कोंडी यामुळे निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या अधिसूचनेनुसार संबंधित मार्गांवर अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत प्रवेश करता येणार नाही. विशेष कारणास्तव या वेळेत प्रवेश आवश्यक असल्यास पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
दहा वाहतूक परिमंडळांतील रस्त्यांचा समावेश
या निर्णयांतर्गत एमआयडीसी, सोनेगाव, सीताबर्डी, सदर, अजनी, कॉटन मार्केट, लकडगंज, सक्करदरा, इंदोरा, कळमणा, पारडी आणि कामठी या वाहतूक परिमंडळांमधील अधिसूचनेत नमूद केलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. यामध्ये लाव्हा-दवलामेटी, जयताळा, प्रतापनगर, पडोळे चौक, आयटी पार्क, धंतोली, पंचशील चौक, धरमपेठ, सदर, गिट्टीखदान, मानेवाडा, मोमिनपुरा, कमाल चौक, नारा, यशोधरानगर, कळमणा, पारडी आणि कामठी परिसरातील विविध मार्गांचा समावेश आहे. या मार्गांवर अवजड वाहनांची वाहतूक रोखून अंतर्गत रस्त्यांवरील सुरक्षितता वाढविण्याचा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न आहे.
बेवारस वाहनांवर कारवाईसाठी विशेष पथक
शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागांवर दीर्घकाळ उभी असलेली बेवारस वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक गठित करण्यात आले आहे. या वाहनांची माहिती संकलित करून संबंधित वाहनधारकांवर चलनात्मक कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांकडे नागरिकांकडून आलेल्या एक हजारांहून अधिक तक्रारींपैकी ७५० पेक्षा जास्त तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याची माहिती मिरखेलकर यांनी दिली.
ई-रिक्षाचालकांना नियमांचे पालन अनिवार्य
ई-रिक्षांची संख्या वाढत असताना त्यांच्या वाहतुकीचे नियमन करण्यावरही वाहतूक विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. ई-रिक्षाचालकांनी निर्धारित नियमांनुसारच वाहन चालविणे अपेक्षित आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे तसेच पुलांवर प्रतिबंधित असताना ई-रिक्षा नेणे अशा प्रकारांवर कारवाई केली जाणार आहे. रस्ते सुरक्षेसाठी चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
ट्रॅव्हल्स चालकांवर २० दिवसांत २६ गुन्हे
दिवाळीच्या काळात प्रवासी वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. खासगी ट्रॅव्हल्स चालक आणि संबंधित वाहनांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मागील २० दिवसांत २६ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. प्रवाशांची सुरक्षितता आणि नियमबाह्य वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे.
रॉंग साईड वाहनचालकांवर २५६ गुन्हे
विरुद्ध दिशेने वाहन चालविणे हा अपघातांना निमंत्रण देणारा गंभीर प्रकार आहे. अशा वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी विशेष कारवाई केली असून, मागील दोन महिन्यांत रॉंग साईड ड्रायव्हिंगप्रकरणी २५६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे.
बाईक टॅक्सी कंपन्यांवरही कारवाई
बाईक टॅक्सी सेवांच्या नियमबाह्य संचालनाविरोधातही वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असलेला व्यावसायिक परवाना आणि संबंधित परवानग्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित बाईक टॅक्सी सेवेकडे आवश्यक परवानगी नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिरखेलकर यांनी दिली.