नायलॉन मांजा विक्री केल्यास अडीच लाखाचा दंड

प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्र कारवाई

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
वाशीम,
separate-action-for-each-violation नायलॉन मांजामुळे होणार्‍या गंभीर अपघातांना आणि जीवितहानीला आळा घालण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक आणि विक्री करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार नायलॉन मांजा वापरणार्‍या किंवा पतंग उडविण्यासाठी त्याचा साठा करणार्‍या व्यक्तीस २५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या विक्रेत्याला तब्बल अडीच लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यासंदर्भात वाशीम पोलिस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
 
 
separate-action-for-each-violation
 
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०१/२०२२ मधील न्यायालयीन आदेशानुसार नायलॉन मांजाच्या वापरावर, साठवणुकीवर आणि विक्रीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नायलॉन मांजा हा मानवी जीवितासह पर्यावरणासाठीही अत्यंत धोकादायक असल्याने न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीने नायलॉन मांजाचा वापर किंवा साठा केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला २५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. संबंधित व्यक्ती अल्पवयीन असल्यास दंडाची रक्कम त्याच्या पालकांकडून किंवा कायदेशीर पालकांकडून वसूल केली जाणार आहे. तसेच नायलॉन मांजाची विक्री करताना आढळणार्‍या विक्रेत्याला २ लाख ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक वेळी नियमांचे उल्लंघन केल्यास स्वतंत्रपणे दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे एकदा कारवाई झाल्यानंतरही पुन्हा नायलॉन मांजाचा वापर अथवा विक्री केल्यास संबंधितांना पुन्हा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दंडाची रक्कम जमा न केल्यास संबंधित अधिकार्‍यांमार्फत वसुलीची प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच १५ दिवसांच्या आत दंड न भरल्यास ही रक्कम महसुली थकबाकीप्रमाणे वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
 
 
नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार, पादचारी, पक्षी तसेच लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा. तसेच त्याची खरेदी-विक्री किंवा साठवणूक करू नये. प्रतिबंधित मांजाची विक्री अथवा वापर निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन वाशीम पोलिस प्रशासनाने केले आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक कार्यालय, वाशीम यांच्या वतीने करण्यात आले आहे.