नवी दिल्ली,
smartphone-prices-riseमेमरी चिप्सच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीमुळे वर्षाअखेरपर्यंत बहुतांश कंपन्यांच्या प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढून प्रति फोन १ लाख रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज बाजार संशोधन संस्था ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’ने शुक्रवारी व्यक्त केला.
स्मार्टफोनच्या किमतीत वाढ होत असतानाच ग्राहकांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. वाढीव किमतीच्या मोबदल्यात मोबाईलचा प्रोसेसिंग वेग, कॅमेरा, बॅटरी, टिकाऊपणा आणि विक्रीपश्चात सेवा (आफ्टर-सेल्स सर्व्हिस) या सर्वच बाबतींत दर्जेदार अनुभव देणाऱ्या ठोस वैशिष्ट्यांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.
काही वर्षांपूर्वी भारतात १ लाख रुपयांचा स्मार्टफोन ही दुर्मीळ गोष्ट होती. फ्लॅगशिप फोनच्या किमती सातत्याने वाढत असल्याने हा दर आता सर्वसामान्य होत चालला आहे. २०२५ च्या तुलनेत २०२६ च्या अखेरीस प्रीमियम फ्लॅगशिप उपकरणांच्या किमती ३० टक्क्यांहून अधिक वाढण्याचा अंदाज आहे, असे ‘काऊंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालात म्हटले आहे.
दरवाढीचे कारण
मेमरी चिपचा वाढता वाटा : २०२५ च्या पहिल्या तिमाहीत एकूण फोनच्या उत्पादन खर्चात मेमरी चिप्सचा वाटा १३ टक्के होता. तो वर्षाअखेरपर्यंत थेट ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
एआय डेटा सेंटर्सचा दबाव : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) डेटा सेंटर्सकडून वाढलेल्या मागणीमुळे तात्पुरत्या स्टोरेजसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘डी-रॅम’ आणि ‘नँड’ मेमरीच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
कंपन्यांची रणनीती बदलणार : २०२५ च्या सुरुवातीला स्मार्टफोनच्या एकूण मटेरियल बिलात मेमरीचा वाटा १३ टक्के होता. तो आता ४० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यामुळे खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी स्मार्टफोन उत्पादकांना फोनची वैशिष्ट्ये, सुटे भाग आणि उत्पादन धोरणांचा फेरविचार करावा लागत आहे.