‘बस एक दिन के लिए फिर छोटी हो जाओ...

    दिनांक :21-Nov-2026
Total Views |
मुंबई
soni razdan
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री सोनी राजदान सध्या त्यांच्या चित्रपट आणि वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘शक: ट्रस्ट नो वन’ या सायकॉलॉजिकल ड्रामा सीरिजमध्ये दिसल्या होत्या. या सीरिजमधील त्यांच्या अभिनयाचे कौतुकही झाले. आता त्या ‘ओम का हरि’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका खास पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या मुली आलिया भट्ट आणि शाहीन भट्ट यांच्या बालपणीचे काही खास फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


आलिया आणि शाहीनच्या बालपणीचे फोटो व्हायरल


सोनी राजदान यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये आलिया आणि शाहीन यांच्यातील गोड नाते पाहायला मिळत आहे. पहिल्या छायाचित्रात छोटीशी आलिया मोठी बहीण शाहीनसोबत दिसत आहे. या फोटोत आलिया अतिशय निरागस आणि गोंडस दिसत आहे. दुसऱ्या छायाचित्रातही दोन्ही बहिणी एकत्र पाहायला मिळतात. तर तिसरे छायाचित्र अलीकडच्या काळातील असून, त्यात सोनी राजदान आपल्या दोन्ही मुलींसोबत दिसत आहेत. एका खास सेलिब्रेशनदरम्यान काढलेल्या या फोटोमध्ये आलिया आई सोनी आणि बहीण शाहीनसोबत सेल्फीसाठी पोझ देताना दिसते.

सोनी राजदान यांची भावूक पोस्ट


दोन्ही मुलींचे हे खास फोटो शेअर करताना सोनी राजदान यांनी एक भावनिक संदेशही लिहिला आहे. ‘प्रत्येक दिवस हा मुलींचाच दिवस असतो. खरं सांगायचं तर तुम्ही दोघीही खूप लवकर मोठ्या झालात. पुन्हा एकदा परत या... फक्त एका दिवसासाठी पुन्हा लहान व्हा. म्हणजे मला तुम्हाला मिठी मारता येईल, नवीन कपडे घालता येतील आणि तुमच्या केसांवरून कंगवा फिरवता येईल. फक्त आणखी एकदा...’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

सोनी राजदान यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर चाहत्यांकडूनही भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. एका चाहत्याने ‘आलिया किती गोड दिसत आहे,’ अशी कमेंट केली. तर दुसऱ्या एका युजरने ‘राहा अगदी आलियासारखीच दिसते,’ असे म्हटले आहे. अनेकांनी या जुन्या फोटोंवर प्रेम व्यक्त केले असून, कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव होत आहे.


सोनी राजदान यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, त्या अलीकडेच नेटफ्लिक्सच्या ‘शक: ट्रस्ट नो वन’ या सायकॉलॉजिकल ड्रामा सीरिजमध्ये दिसल्या होत्या. रेंसिल डिसिल्वा यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. रहस्य आणि थराराने भरलेल्या या मालिकेत परिणीती चोप्रा आणि जेनिफर विंगेट मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय सोनी राजदान ‘सॉन्ग्स ऑफ पॅराडाइज’ या म्युझिकल बायोग्राफिकल चित्रपटातही झळकल्या होत्या. या चित्रपटात सबा आझाद यांचीही भूमिका आहे. आता ‘ओम का हरि’ या त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.