कुरखेडा,
state-level-award कुरखेडा तालुक्यातील देऊळगावच्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांच्या ‘रानभाज्यांच्या जगात संशोधन ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मानवी जीवनाच्या तसेच मुक्या प्राण्यांच्या सुदृढ निरोगी दीर्घायुष्यासाठी व समाजाचे हित ठेवून संगीता संतोष ठलाल यांनी रानभाज्यांचे, वनस्पतींचे संशोधन करून दुर्मिळ असलेला ‘रानभाज्यांच्या जगात’ नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ सर्व परिचित असल्यामुळे याआधी सुद्धा या ग्रंथास राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रभूरत्नाई पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सोबतच या ग्रंथाचे योगदान जाणून त्यांचे विविध ठिकाणी सत्कार सुद्धा झाले आहेत.

गेल्या काही दिवसाआधी नाट्यश्री साहित्य कलामंच शाखा गडचिरोली यांच्या वतीने विविध साहित्य निर्मितीची निवड करून पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात संगीता ठलाल यांच्या ‘रानभाज्यांच्या जगात’ ग्रंथाचे महत्त्व जाणून या ग्रंथाची निवड करण्यात आली. अतिशय मानाचा मानला गेलेला ‘राज्यस्तरीय महामृत्युंजय वाड्मय पुरस्कार त्यांच्या ग्रंथास जाहीर करण्यात आले आहे. याआधी सुद्धा संगीता ठलाल यांच्या सामाजिक, साहित्यिक कार्याची दखल घेऊन रेडिओ आकाशवाणी केंद्र नागपूर, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर मुलाखत झालेली आहे. सोबतच भारत सरकारच्या साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने ‘ग्रामलोक’ या कार्यक्रमात त्यांचे रानभाज्यांवर कथन झाले आहेत. येत्या 20 डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते संगीता ठलाल यांना राज्यस्तरीय महामृत्युंजय वाड्मय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा बहुचर्चित असलेला पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संगीता ठलाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.