कारंजा लाड,
good-samaritan-award-for-sham-sawai रस्ते अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर मदत मिळाली, तर त्याचे प्राण वाचू शकतात. मात्र, अपघातग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेकजण पुढे येण्यास कचरतात. अशा परिस्थितीत कोणताही स्वार्थ न ठेवता अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणार्या कारंजा येथील सर्वधर्म मित्र मंडळाचे अध्यक्ष श्याम रामदास सवाई यांच्या सेवाकार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आहे. मुंबई येथे त्यांना राज्यस्तरीय ‘गुड समॅरिटन सन्मान २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. यापूर्वी केंद्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘राहवीर पुरस्कार’ मिळाल्यानंतर राज्य शासनाकडून मिळालेला हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याची महत्त्वपूर्ण पोचपावती ठरला आहे.

जागतिक रस्ता अपघातग्रस्त स्मरण दिनानिमित्त २० नोव्हेंबर रोजी मुंबईतील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, चर्चगेट येथे परिवहन विभाग, महाराष्ट्र शासन आणि परिसर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते तसेच परेश शेठ यांच्या हस्ते श्याम सवाई यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रम संचालक रणजीत गाडगीळ, सीएसआर डायरीचे परेश शेठ, सेवानिवृत्त अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, डॉ. विशाखा फणसाळकर, डॉ. कौस्तुभ घाटोळे, डॉ. वेदव्यास मोरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सर्वधर्म मित्र मंडळाच्या माध्यमातून श्याम सवाई हे सातत्याने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहेत. या सेवाकार्याला वाशिम जिल्हा प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलिस अधीक्षक नितेश खाटमोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे तसेच संग्राम जगताप यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे श्याम सवाई यांनी यावेळी बोलताना नमूद केले. कार्यक्रमाला सर्वधर्म मित्र मंडळाचे जनसंपर्क अधिकारी धनंजय राठोड आणि सास कर्तव्य सेवक दीपक सोनवणे यांची उपस्थिती होती.