सोलापूर
vitthalrao shinde sugar factory राज्यात ऊस दरवाढीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यात ऊस दरावरून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता वाढली असून, माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे गाळप संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. ३,५०० रुपये प्रतिटन पहिली उचल जाहीर करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी थेट कारखान्यात प्रवेश केला आणि गव्हाणीमध्ये उतरून गाळप प्रक्रिया रोखली. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

ऊस दर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा निर्णय पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचा दावा संघटनेकडून करण्यात येत आहे. मात्र, हा निर्णय झाल्यानंतरही अनेक साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी कारखाने बंद पाडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच भाग म्हणून पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याविरोधातही आंदोलन करण्यात आले.
कारखान्याने उसाची पहिली उचल प्रतिटन ३,५०० रुपये जाहीर करावी, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत कारखाना प्रशासन हा दर जाहीर करत नाही, तोपर्यंत गव्हाणीशेजारीच ठिय्या मांडून बसणार आणि कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचे गाळप सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. कार्यकर्त्यांनी थेट गव्हाणीमध्ये उतरून गाळप प्रक्रिया रोखल्याने कारखान्यातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
दरम्यान, ऊस दरवाढीचा मुद्दा केवळ सोलापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नसून अहमदनगर जिल्ह्यातही शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. समाधानकारक ऊस दर मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत. या मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे स्वतः या मोर्चात सहभागी होणार आहेत.
या आंदोलनात जिल्ह्यातील अधिकाधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. त्यामुळे अहमदनगरमध्येही ऊस दराच्या प्रश्नावरून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये कारखान्याचे गाळप रोखण्यापासून सुरू झालेला संघर्ष आता अहमदनगरमधील जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चापर्यंत पोहोचला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळणार की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे आता सहकार आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.