सातारा,
tarli-project-adani-work-stoppedएकीकडे कर्जत-भीमाशंकरमधील टोरेंट प्रकल्पाला विरोध वाढत असताना दुसरीकडे साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील तारळी पंप स्टोरेज प्रकल्पावरुनही चांगलाच वाद पेटला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने 13 नोव्हेंबर रोजीच अदानी प्रकल्पाच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावत काम तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश देण्यात आले आहेत. रोहन भाटे यांच्या तक्रारीनंतर हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.
पाटण येथील ह्या प्रकल्पामुळे वृक्षांची तोड होत असून पर्यावरणास हानीकारक प्रकल्प असल्याचे सांगत विरोध वाढत आहे. त्यातच, 15 नोव्हेंबर रोजी अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रकल्पविरोधी लढ्याचे युवक आंदोलक विवेकानंद पाटील यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देत पाहणी केली. हे काम अनधिकृत असल्याचा आरोप करत त्यांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. त्यामुळे तारळी प्रकल्पाचा वाद आता अधिकच चिघळला आहे. त्यातच, आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला दणका दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आधीच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने अदानी कंपनीला प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश दिले असताना आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकल्पाला दणका दिला आहे. आवश्यक संमती आणि पर्यावरणीय मंजुरीशिवाय काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंडळाने उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. मौजे सावरघर येथील गट क्रमांक 33 आणि 34 मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीत आवश्यक परवानग्यांशिवाय उत्खनन आणि विकासकाम सुरू असल्याचे आढळून आले. त्यानंतर, सध्या सुरू असलेली तसेच प्रस्तावित उत्खनन आणि बांधकामाची कामे तात्काळ बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मंडळाची पूर्वपरवानगी मिळाल्याशिवाय कोणतेही काम पुन्हा सुरू करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.