लाहोर,
three-players-including-rizwan-out पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) २०२६-२७ या वर्षासाठी नव्या केंद्रीय कराराची घोषणा केली असून, यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या करारात खेळाडूंची संख्या ३० वरून वाढवून ३८ करण्यात आली आहे. मात्र, पाकिस्तानचे अनुभवी खेळाडू मोहम्मद रिझवान, शान मसूद आणि सॅम अयुब यांना या यादीतून वगळण्यात आल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, युवा खेळाडूंना संधी देण्यावर बोर्डाने भर दिला आहे. नव्या करारामध्ये बाबर आझम आणि सलमान आगा यांना सर्वोच्च श्रेणीत स्थान देण्यात आले आहे. यंदा पीसीबीने कराराची पद्धत बदलून प्रथमच क्रिकेटच्या प्रकारानुसार खेळाडूंचे वर्गीकरण केले आहे. एकूण ३८ खेळाडूंची पाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हा करार जुलै २०२६ ते जून २०२७ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. मागील कराराची मुदत जूनमध्ये संपल्यानंतर खेळाडू नव्या कराराच्या प्रतीक्षेत होते.

नव्या रचनेनुसार, कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी 'एबी' गट तयार करण्यात आला असून, त्यात बाबर आझम आणि सलमान आगा यांचा समावेश आहे. केवळ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना 'ए' गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात अझान अवैस, मोहम्मद अब्बास, साजिद खान आणि सौद शकील यांचा समावेश आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी 'बीसी' गट निश्चित करण्यात आला आहे. या श्रेणीत अबरार अहमद, अराफत मिन्हास, फखर जमान, फहीम अश्रफ, हारिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना स्थान मिळाले आहे.
केवळ टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा 'सी' गटात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हसन नवाज, माझ सदाकत, सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, शादाब खान आणि उस्मान तारिक यांचा समावेश आहे. याशिवाय उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 'डी' गट तयार करण्यात आला आहे. या गटात अब्दुल समद, अब्दुल्ला फजल, अहमद दानियाल, अली रझा, फरहान युसूफ, हुनैन शाह, मोहम्मद ताहा, तय्यब आरिफ, गाझी घोरी, इम्रान रंधावा, राजाउल्ला, साद बेग, साद मसूद, समीर मिन्हास, साकिब खान, शाहजेब खान, श्यामल हुसेन आणि सुफयान मुकब शाह यांचा समावेश आहे. अनुभवी खेळाडूंना करारातून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या पीसीबीच्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील बदलांची चर्चा सुरू झाली आहे.