सना,
yemen-saudi-airstrikes-41-killedयेमेनमध्ये गत २४ तासांत झालेल्या सौदी हवाई हल्ल्यांमध्ये सुमारे ४१ जण ठार झाले आहेत़ यात ११ मुले आणि सात महिलांचा समावेश आहे. दरम्यान, हुथी-प्रशासित वृत्तवाहिनीनुसार, हुथींनी नैऋत्य सौदी अरेबियातील एका वीज प्रकल्पासह बंदरावर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
हुथी-नियंत्रित राजधानी सना येथील आरोग्य अधिकाऱ्यांचा हवाला देत, या वृत्तवाहिनीने शुक्रवारी सांगितले की, या हल्ल्यांमध्ये तीन मुलांसह इतर २८ जण जखमी झाले आहेत़ मात्र, या आकडेवारीची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकली नाही़ तसेच सौदी अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, हुथी लष्करी प्रवक्ते याह्या सारिया यांनी एका निवेदनात म्हटले की, त्यांच्या गटाने सौदी अरेबियाच्या जाझान प्रदेशातील अल-शुकाइक वीज प्रकल्प आणि जाझान बंदराला लक्ष्य केले होते. येमेनच्या उत्तरेकडील सादा प्रांत आणि लाल समुद्राच्या किनाऱ्यावरील मोचा शहरातील वीज प्रकल्पांवर सौदी अरेबियाने केलेल्या हल्ल्यांना आणि होदेदा बंदरावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले.
पुन्हा हल्ला केल्यास प्रतिहल्ला करणार
जर येमेनच्या बंदरांवर किंवा वीज प्रकल्पांवर आणखी हल्ले झाले, तर सौदी अरेबिया तात्काळ अशाच प्रकारच्या सौदी प्रकल्पांवर प्रतिहल्ला करेल, असा इशाराही सारिया यांनी दिला आहे. दरम्यान, येमेनमधील सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीने सांगितले की, त्यांच्या हवाई संरक्षण दलाने जाझानच्या दिशेने आलेली दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे रोखून नष्ट केली. त्याचे काही तुकडे अल-शुकाइक परिसरात पडले, जिथे संबंधित अधिकारी परिस्थिती हाताळत आहेत.
एकमेकांच्या आघाड्यांवर हल्ले
हुथी बंडखोर आणि सौदी-समर्थित सरकारी सैन्य यांच्यातील लढाई तीव्र झाली असून, दोन्ही बाजू अनेक आघाड्यांवर एकमेकांवर हल्ले सुरू आहेत. याच दरम्यान या घटना घडल्या आहेत. गत काही दिवसांत, हुथींनी सौदी विमानतळे, तेल केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या आस्थापनांवर वारंवार क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला आहे. हुथी माध्यमांनुसार, सौदी अरेबियाने येमेनी निवासी भाग आणि पायाभूत सुविधांवरील हवाई हल्ले तीव्र केले आहेत.