हैदराबाद,
youth congress युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची सोशल मीडिया खाती निलंबित केल्याच्या निषेधार्थ तेलंगणातील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हैदराबाद येथील मेटाच्या कार्यालयात गोंधळ घालत तोडफोड केली. राज्याध्यक्ष जक्किडी शिवचरण रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी मेटा आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी कार्यालयातील फुलदाण्यांची फेकाफेक करण्यात आली, तर काही वस्तूंचेही नुकसान झाले. सोशल मीडियावर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निलंबित खाती आणि हटविण्यात आलेल्या पोस्ट पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
या आंदोलनामागे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि राष्ट्रीय प्रभारी मनीष शर्मा यांच्या सोशल मीडिया खात्यांवर मेटाने घातलेले निर्बंध असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईच्या निषेधार्थ मुंबईतील बीकेसी परिसरातील मेटा कार्यालयाबाहेरही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करणाऱ्या नेत्यांचे आवाज जाणीवपूर्वक दाबले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. भारतीय युवक काँग्रेसने 'एक्स'वरील पोस्टद्वारे मेटाला सात दिवसांची मुदत देत निलंबित खाती आणि पोस्ट पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा न्यायालयापासून रस्त्यांपर्यंत आणि कार्यालयांपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला.
दरम्यान, या घटनेवरून भाजपने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गुंड संबोधत खासगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करणे ही काँग्रेसची कार्यपद्धती असल्याचा आरोप केला. यापूर्वी वर्ल्ड एआय समिटमध्ये झालेल्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला. दुसरीकडे, बीआरएस नेते के. टी. रामाराव यांनीही या घटनेचा निषेध करत राहुल गांधी यांना लक्ष्य केले.youth congress कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी काँग्रेसकडे गुंडगिरी हाच मार्ग आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे सोशल मीडिया खात्यांच्या निलंबनावरून सुरू झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.