रंगय्यापल्ली,
spur-the-administration-into-action सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली गावातील मूलभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी येथील युवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले. गावातील प्रलंबित प्रश्नांवर केवळ चर्चा न करता प्रशासक तांबे व ग्रामपंचायत अधिकारी पोटावी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. यामध्ये जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग, अंगणवाडी इमारत, आरोग्य उपकेंद्र, नाल्यांची स्वच्छता, युवकांसाठी व्यायामशाळा, विद्युत जोडणी आणि पथदिवे या विषयांचा समावेश होता.

गावातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत ग्रामपंचायतीमार्फत पत्र देऊन जिल्हा परिषद गडचिरोली येथे पाठपुरावा करण्याचे ठरले. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला माती टाकण्याच्या मागणीसाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. अंगणवाडी क्रमांक दोनच्या जीर्ण इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्ताव पाठविण्याबाबत चर्चा झाली. आरोग्य उपकेंद्राची पाहणी करण्यात आली. गावातील नाल्यांची उपसणी व स्वच्छतेचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला. युवकांसाठी जिम उभारण्याचा प्रस्ताव, बसस्थानक ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत विद्युत पोल व वीज जोडणी, तसेच गावातील प्रमुख चौकांत हॅलोजन दिवे बसविण्याची मागणी करण्यात आली.
युवकांनी मांडलेल्या प्रश्नांवर आवश्यक प्रस्ताव सादर करून संबंधित कामांसाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासक तांबे व ग्रामपंचायत अधिकारी पोटावी यांनी दिले. गावातील प्रश्नांसाठी युवकांनी पुढाकार घेत प्रशासनासोबत प्रत्यक्ष पाहणी केल्याने आता या आश्वासनांची अंमलबजावणी कधी होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. यावेळी प्रशासक तांबे व ग्रामपंचायत अधिकारी पोटावी यांनी युवक आणि ग्रामस्थांशी चर्चा करून गावातील समस्या जाणून घेतल्या. समस्यांवर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याप्रसंगी युवक मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.