१४ वर्षांच्या मुलाने हॅक केली अग्निवीरांची वेबसाइट

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
मुंबई
hacks
देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या माहितीच्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणातील वल्लभगढ येथील अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने अग्निवीरांशी संबंधित माहिती असलेली वेबसाइट हॅक करून सुमारे चार हजार जवानांचा गोपनीय डेटा चोरल्याचा आरोप आहे. हा डेटा डार्क वेबवर ५०० डॉलर म्हणजेच जवळपास ४७ हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.



वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांची लष्करी सेवा पूर्ण केलेल्या माजी अग्निवीरांना केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी शोधता याव्यात, या उद्देशाने एक वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवून मुलाने सुमारे चार हजार जवानांची माहिती चोरल्याचा संशय आहे. त्यानंतर इंटरनेटवरील काळ्या बाजारपेठेत ओळखल्या जाणाऱ्या डार्क वेबवर या माहितीच्या विक्रीसाठी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकारासाठी मुलाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साधनांचा वापर केला असावा, असा तपास यंत्रणांना संशय आहे.

दिल्ली पोलिसांच्या ‘इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स’ (IFSO) या विशेष सायबर पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत संबंधित मुलाच्या डिजिटल उपकरणांची तपासणी केली. या कारवाईत उपकरणांमधील डेटा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेली माहिती खरोखरच अग्निवीरांची आहे का, तसेच या सायबर हल्ल्याची व्याप्ती किती आहे, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. अधिकृत अग्निवीर डेटाबेसशी जप्त केलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी आवश्यक परवानगीही मागण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जून २०२२ मध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात तरुणांची भरती करण्यासाठी ‘अग्निपथ’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत चार वर्षांच्या सेवेसाठी निवडल्या जाणाऱ्या तरुण-तरुणींना ‘अग्निवीर’ असे संबोधले जाते. चार वर्षांचा सेवाकाल पूर्ण झाल्यानंतर संबंधित जवानांची कामगिरी आणि सशस्त्र दलांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक तुकडीतील जास्तीत जास्त २५ टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत कायम केले जाते. उर्वरित जवानांना एकरकमी ‘सेवा निधी’ देऊन सेवेतून मुक्त केले जाते. त्यानंतर त्यांना सरकारी तसेच खासगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची तरतूद या योजनेत आहे. याच पार्श्वभूमीवर माजी अग्निवीरांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वेबसाइटमधील माहिती चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.