मुंबई
418 movie हॉरर चित्रपटांमध्ये रहस्य, थरार आणि भीतीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला, तर प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढते. अशाच प्रेक्षकांसाठी सध्या ओटीटीवर एक खास चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. शापित हॉस्टेल, एका रहस्यमयी खोलीतील भयावह घटना आणि त्यामागचं न उलगडलेलं गूढ अशा वेगळ्या कथानकावर आधारित ‘418’ या तेलुगू हॉरर थ्रिलर चित्रपटाने नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे.

‘418’ या चित्रपटाची कथा कर्नाटकातील एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घडते. या हॉस्टेलमधील 418 क्रमांकाची खोली चित्रपटाच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे. ही खोली शापित असल्याची चर्चा असते. या खोलीशी संबंधित अनेक विचित्र, रहस्यमयी आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटना घडत असतात. या खोलीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कोणत्या भयावह अनुभवांना सामोरं जावं लागतं, याभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. हॉस्टेलमधील वातावरण, खोलीशी जोडलेलं गूढ आणि सातत्याने घडणाऱ्या अनाकलनीय घटना यामुळे चित्रपटातील उत्कंठा कायम राहते.
या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ भीतीदायक प्रसंगांची रेलचेल नाही, तर प्रेक्षकांना शेवटपर्यंत कथेशी जोडून ठेवणारं रहस्यही आहे. त्यामुळे हॉरर आणि सस्पेन्सपट आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक वेगळा अनुभव ठरू शकतो. विशेषतः रात्री एकट्याने चित्रपट पाहणाऱ्यांसाठी त्यातील काही प्रसंग चांगलेच भीतीदायक ठरू शकतात.
‘418’ या चित्रपटाला आणखी एक महत्त्वाची पार्श्वभूमी लाभली आहे. ‘केजीएफ’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाला प्रेझेंट केलं आहे. तर दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक कीर्तन नाडागौडा यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या कथानकाबरोबरच त्याच्याशी जोडलेल्या या नावांमुळेही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘418’ने ओटीटीवरही आपली छाप पाडली आहे. 20 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध झाला. प्रदर्शनानंतर काही दिवसांतच नेटफ्लिक्सच्या ट्रेंडिंग यादीत त्याने पहिला क्रमांक पटकावला. त्यामुळे सध्या या चित्रपटाची ओटीटीविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे, प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादासोबतच चित्रपटाच्या IMDb रेटिंगनेही लक्ष वेधलं आहे. ‘418’ या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 8 गुण मिळाले आहेत. त्यामुळे हॉरर चित्रपटांची आवड असलेल्या आणि नेहमीच्या कथांपेक्षा काहीतरी वेगळं पाहण्याच्या शोधात असलेल्या प्रेक्षकांसाठी ‘418’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवरील वॉचलिस्टमध्ये समाविष्ट करण्यासारखा ठरू शकतो.