अमरावती,
meet navneet आपल्या आवडत्या नेत्याविषयी असलेले प्रेम, निष्ठा आणि आदर व्यक्त करण्यासाठी आंध्र प्रदेशातील एका चाहत्याने तब्बल १२०० किलोमीटरचा पायी प्रवास करत अमरावती गाठली. भाजपा नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या भेटीसाठी शेखर नायडू यांनी १५ दिवस पायी प्रवास केला. त्यांच्या या अनोख्या प्रवासाची सध्या चर्चा होत आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील राजम गावचे रहिवासी असलेले शेखर नायडू हे नवनीत राणा यांचे कट्टर चाहते आहेत. आपल्या आवडत्या नेत्या प्रत्यक्ष भेटाव्यात, त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता आणि प्रेम व्यक्त करता यावे, या भावनेतून त्यांनी निजामाबाद ते अमरावती असा सुमारे १२०० किलोमीटरचा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तब्बल १५ दिवसांच्या प्रवासानंतर ते अमरावतीत पोहोचले.
अमरावतीत दाखल झाल्यानंतर शेखर नायडू यांनी नवनीत राणा यांची सदिच्छा भेट घेतली. आपल्या आवडत्या नेत्या समोर पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले, आपल्या आवडत्या माणसाला प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही, असे त्यांनी भावनिक उद्गार काढले. शेखर नायडू यांच्या या अनोख्या भेटीने राजकीय नेत्यांविषयी चाहत्यांच्या मनात असणारी आत्मीयता, आपुलकी आणि समर्पणाची भावना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.