मराठी साहित्य भूतकाळाच्या गौरवगाथेत अडकले-डॉ. अभय बंग यांची खंत

नांदी संमेलनाचे नागपुरात थाटात उद्घाटन

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
नागपूर,
abhay-bang-marathi-literatureमराठी साहित्याला समृद्ध अशी प्राचीन परंपरा लाभली असली, तरी ते भूतकाळाच्या गौरवगाथेत आणि स्वतःच्या दुःखगाथेत अडकून पडले आहे. या चौकटीतून बाहेर पडत मराठी साहित्यिकांनी भविष्याचा वेध घेणारे, समाजाच्या वर्तमानातील प्रश्नांना भिडणारे आणि उद्याच्या आव्हानांची चाहूल देणारे साहित्य निर्माण करणे आवश्यक आहे, अशी परखड भूमिका वैद्यकीय व सामाजिक कार्यकर्ते, सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी मांडली.
 

abhay bang 
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे आणि विदर्भ साहित्य संघ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पृष्ठभूमीवर रविवारी ‘नांदी’ संमेलनाचे आयोजन सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात करण्यात आले होते. संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. बंग बोलत होते. साहित्यिकांकडे काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी असायला हवी, दिल्लीतील अलीकडील आंदोलनातून तरुणाईतील असंतोष आणि वैफल्य समोर आले. जवळपास ६० वर्षांपूर्वी ‘कोसला’मधून व्यक्त झालेल्या वैफल्याची जाणीव आजच्या मराठी साहित्यिकांना समकालीन वास्तवात का दिसत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एकेकाळी साहित्यिक आणि समाजसेवक हे महाराष्ट्राचे आदर्श आणि समाजाचे आयकॉन होते. मात्र, आज त्यांनी हे स्थान गमावले आहे, अशी खंत डॉ. बंग यांनी व्यक्त केली. शब्द आणि साहित्य यांच्यातील नाते स्पष्ट करताना ते म्हणाले, शब्दांचे खरे अर्थ लोकांच्या जगण्यात दडलेले असतात, तर साहित्य हे त्या शब्दांना समाजापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम असते. त्यामुळे साहित्याने केवळ भूतकाळाचे वर्णन किंवा वैयक्तिक दुःखाचे चित्रण करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या बदलत्या वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. आगामी पुणे साहित्य संमेलनाकडूनही त्यांनी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात आस्था कार्लेकर म्हणाल्या, साहित्य, संस्कृती, कला हे भारतीय संस्कृतीचा ठेवा आहे. हा ठेवा जतन करून ठेवण्यासाठी सर्व कलाकार, साहित्यिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. त्यासाठी मध्य दक्षिणीतर्फे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रास्ताविकात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी नांदी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. वि. सा. संघाचे कार्यवाह विलास मानेकर यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
साहित्य संमेलने समाजासाठी ऊर्जास्रोत ठरावीत - डॉ. आवलगावकर
मराठी विद्यापीठ, रिद्धपूरचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर म्हणाले, साहित्य संमेलनांमुळे साहित्याचा उत्सव साजरा होतो आणि समाजात जनजागृती निर्माण होते, ही समाधानाची बाब आहे. मात्र, ही संमेलने केवळ साहित्यिकांच्या एकत्र येण्यापुरती मर्यादित न राहता समाजासाठी ऊर्जास्रोत ठरली पाहिजेत. साहित्यिकांचे विचार, अभिव्यक्ती आणि वैचारिक मंथन जनसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.