बुलढाणा
bogus doctor मुलगा की मुलगी हे जाणून घेण्यासाठी गर्भलिंग निदानाची बेकायदेशीर चाचणी करणाऱ्यांविरोधात आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतातील पत्र्याच्या गोठ्यात चक्क पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग निदानाचा अवैध व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी स्वतः पथकासह छापा टाकून एका बोगस डॉक्टरसह तिघांना रंगेहात पकडले. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या संयुक्त पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने ही कारवाई केली. या प्रकरणाचे धागेदोरे आता वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील अनेक डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, गर्भलिंग निदानासाठी महिलांना पाठवणारे डॉक्टरही आरोग्य विभागाच्या रडारवर आले आहेत.

या कारवाईसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार आणि त्यांचे पथक सकाळी सहा वाजल्यापासून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. चिखली तालुक्यातील अमडापूर-लव्हाळा मार्गावरील गणेश शंकरराव सूर्यवंशी यांच्या शेतात हा बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार बनावट ग्राहकाच्या मदतीने आरोग्य विभागाने सापळा रचला. शेतातील पत्र्याच्या गोठ्यात पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने गर्भलिंग निदानाची चाचणी केली जात असल्याचे समोर येताच पथकाने तातडीने छापा टाकला. यावेळी एका बोगस डॉक्टरसह तिघांना घटनास्थळीच पकडण्यात आले.
या प्रकरणी तिघांविरोधात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अर्थात पीसीपीएनडीटी कायद्यानुसार तसेच विविध कायदेशीर कलमांअंतर्गत अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून, या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरू आहे. ग्रामीण भागातील शेतातील गोठ्याचा वापर करून अशा प्रकारे गर्भलिंग निदानाचा काळाबाजार सुरू असल्याचे उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या कारवाईनंतर आता तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गर्भलिंग निदानासाठी महिलांना या ठिकाणी पाठवणारे डॉक्टर कोण आहेत, या बेकायदेशीर व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीनचा वापर करून हा प्रकार किती काळापासून सुरू होता, याचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही बडे डॉक्टर आणि या अवैध व्यवहाराशी संबंधित व्यक्ती तपासाच्या कक्षेत येण्याची शक्यता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी व्यक्त केली आहे.
एका बोगस डॉक्टरसह तिघांना अटक झाली असली, तरी या रॅकेटचे मुख्य सूत्रधार आणि गर्भलिंग निदानासाठी महिलांना पाठवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेणे हे आता तपास यंत्रणांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील कारवाईत आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणातून गर्भलिंग निदानाच्या बेकायदेशीर व्यवसायाचे आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.