वाहतूक पोलिसांनी लावले १३४४ बुलेटचालकांना ‘फटाके’

कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण; दोन वर्षांत १०.२० लाखांचा दंड वसूल

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
bullet-silencer-police-actionबुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून रस्त्यांवर ‘फट्‌फट्‌’ असा कर्णकर्कश आवाज करत धुमाकूळ घालणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलेटचा रुबाब दाखविण्याच्या नादात शहरातील शांतता भंग करणाऱ्या चालकांना पोलिसांनी दणका दिला आहे. गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारच्या तब्बल १ हजार ३४४ बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १० लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमबाह्य सायलेन्सरचा वापर करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम सुरू असल्याचे स्पष्ट होते.
 

bullet 
बुलेट हे तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले वाहन आहे. मात्र, काही चालकांनी या वाहनाच्या लोकप्रियतेला कर्णकर्कश आवाजाची जोड दिली आहे. सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसविणे, वाहनाचा वेग वाढविताना मुद्दाम ‘फट्ट’ असा मोठा आवाज काढणे आणि गर्दीच्या रस्त्यांवरून जाताना ‘फटाक्यांसारखा’ आवाज करणे, असे प्रकार शहरातील विविध भागांत पाहायला मिळतात. अशा आवाजामुळे वाहनचालकांना थरारक अनुभव मिळत असला, तरी रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांसाठी मात्र तो त्रासदायक ठरत आहे. वाहनाचा आवाज वाढविण्यासाठी सायलेन्सरमध्ये फेरफार करण्याची प्रवृत्ती रोखण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे.
आवाजाचा थरार; नागरिकांची डोकेदुखी
बुलेटच्या सायलेन्सरमधून अचानक मोठा आवाज झाल्यास रस्त्यावरून जाणारे पादचारी, दुचाकीस्वार आणि इतर वाहनचालकही दचकतात. विशेषतः रात्रीच्या वेळी परिसरात शांतता असताना अशा वाहनांचा आवाज अधिक त्रासदायक ठरतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विश्रांती घेत असलेल्या व्यक्तींना याचा त्रास होऊ शकतो. रुग्णालये, शाळा आणि निवासी परिसरांजवळ अशा प्रकारच्या आवाजामुळे शांततेचा प्रश्न निर्माण होतो.
दोन वर्षांत १,३४४ चालकांवर कारवाई
वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये नियमबाह्य सायलेन्सर असलेल्या ६९३ बुलेटचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून ५ लाख २८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आणखी ६५१ चालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. नियमबाह्य सायलेन्सरचा वापर हा शहरातील वाहतूक व्यवस्थेसमोरील एक महत्त्वाचा प्रश्न असल्याचे दिसून येते.
केवळ दंड नव्हे, नियमपालनही महत्त्वाचे
वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. वाहनाचा मूळ सायलेन्सर बदलून अनावश्यक आवाज निर्माण करणे टाळले पाहिजे. शहरातील वाढती वाहतूक, वाहनांची संख्या आणि ध्वनिप्रदूषणाच्या समस्या लक्षात घेता नियमबाह्य सायलेन्सरविरुद्धची कारवाई सातत्याने करण्यात येत आहे. बुलेटचालकांवर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली आहे.
- आदित्य मिरखेलकर (पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.)