कोल्हापूर,
dowry-harassment-20-lakh-demandकोल्हापूर जिल्ह्याच्या इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावत एका नवविवाहितेचा अमानुष छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित नवविवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपाशी ठेवून मारहाण; दागिने आणि मंगळसूत्र काढून घरातून हाकलले, सासरच्या मंडळींकडून नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी विवाहितेने माहेरून २० लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली जात होती. पैशांची ही मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला सतत टोमणे मारणे, उपाशी ठेवणे आणि मारहाण करणे असे प्रकार सुरू केले.
आरोपींनी अवघ्या अर्ध्या चपातीवर तब्बल तीन दिवस विवाहितेला उपाशी ठेवल्याचा आरोपही पीडितेनं केला आहे. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि सौभाग्याचे लेणे असलेले मंगळसूत्रही काढून घेतले आणि तिला घराबाहेर हाकलून दिल्याचा गंभीर आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.