मानोरा,
rabi-crops तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरत आहे. थंडीचा जोर वाढल्याने सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत सर्वत्र धुके पसरलेले दिसत आहे. या धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची भीती शेतकर्यांमध्ये व्यक्त होत आहे. तालुक्यात सध्या तूर, हरभरा, गहू, संत्रा आणि भाजीपाला ही पिके जोमात आहेत. मात्र, सतत पडणार्या धुक्यामुळे पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. विशेषतः तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी, हरभर्यावर मर रोग आणि घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. संत्रा बागांवरही डिंक्या आणि फळगळीची समस्या निर्माण झाली आहे.

भाजीपाल्यावर करपा, भुरी यासारखे रोग पसरत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. धुक्यामुळे सुर्यप्रकाश पिकांना मिळत नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या पिकांना धुके अतिशय घातक ठरत आहे. फुले गळून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकर्यांना आता रब्बीतही धुक्याचा फटका बसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. औषध फवारणीचा खर्च वाढला असूनही अपेक्षित परिणाम मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. कृषी विभागाने शेतकर्यांना धुक्यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी फवारणी करणे, पिकांना हलके पाणी देणे आणि रोगग्रस्त झाडांची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तसेच नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करून मदत मिळवून देण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे. धुके कमी होऊन ऊन पडले तरच पिके वाचतील, अन्यथा रब्बी हंगामही हातचा जाण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.