दोहा,
india-and-pakistan-to-clash-again क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटले की चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचते. आज पुन्हा एकदा हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. यंदाच्या वर्षात आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यांत भारतीय संघाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे.
२०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली लढत आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या सुपर सिक्स फेरीत झाली होती. या सामन्यात भारतीय युवा संघाने दमदार खेळ करत पाकिस्तानवर ५८ धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ पुन्हा भिडले. या सामन्यातही भारताने आपले वर्चस्व कायम राखत पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला.
यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. या लढतीत भारताने १९ धावांनी बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले. मात्र, एसीसी पुरुष १९ वर्षांखालील आशिया चषकाच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला. यंदाच्या वर्षातील भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा हा एकमेव पराभव ठरला. मात्र, याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पराभवाचा वचपा काढला. चुरशीच्या लढतीत पाकिस्तानला एका गडीने नमवत भारताने विजेतेपद पटकावले. अशाप्रकारे यंदाच्या वर्षातील पाच सामन्यांमध्ये भारताने चार विजय मिळवले आहेत.
आता आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ स्पर्धेत दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. ही स्पर्धा ५० षटकांच्या स्वरूपात खेळवली जात आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला पराभूत करून स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. दोहा येथे होणाऱ्या आजच्या सामन्यातही पाकिस्तानला नमवून विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारत-पाकिस्तान यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून, नाणेफेक दुपारी ३ वाजता होईल. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या महामुकाबल्याकडे लागले आहे.