बंगळुरू,
indian-language-ai-keyboardभारतात संगणक आणि इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ परंतु अनेकांना आजही भाषेची अडचण येते़ बंगळुरू स्थित स्टार्टअप ‘का-नादा फोनेटिक्स’ने एक अद्वितीय कीबोर्ड विकसित करून ही अडचण दूर केली आहे. बंगळुरू टेक समिटमध्ये सादर करण्यात आलेला हा कीबोर्ड अनेक भारतीय भाषांमध्ये काम करण्यासाठी परिपूर्ण आहे. देशातील संगणक वापरकर्ते आणि वापरकर्ते नसलेले यांच्यातील दरी कमी करणे आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणे, हे या कीबोर्डचे उद्दिष्ट आहे. या अद्वितीय कीबोर्डद्वारे लोकांना त्यांच्या मातृभाषेत एआय वापरण्याची सोय उपलब्ध करून देणे, हे देखील कंपनीचे उद्दिष्ट आहे.
बंगळुरू टेक समिटमध्ये, 'का-नादा फोनेटिक्स'चे मुख्य नवोपक्रम अधिकारी (चीफ इनोव्हेशन ऑफिसर) गुरू प्रसाद यांनी या अद्वितीय कीबोर्डचे सादरीकरण केले. ते म्हणाले, इंग्रजीच्या अभावामुळे संगणक वापरण्यास संकोच करणाऱ्या प्रादेशिक विक्रेते, स्थानिक कारागीर आणि लहान व्यवसायांसाठी हा कीबोर्ड तयार करण्यात आला आहे. या कीबोर्डमुळे, ते आता सहजपणे त्यांच्या स्वतःच्या भाषेत संगणक वापरू शकतील. शिवाय, ते आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एआय चॅटबॉट्सचा सहज वापर करू शकतील.
हा अनोखा कीबोर्ड संगणक किंवा एआय वापरताना येणाऱ्या भाषिक अडथळ्यांवर मात करतो. यात एक सोपी फोनेटिक मांडणी आहे, जी भारतीय भाषांमधील स्वर आणि व्यंजनांना एकत्रित करते. यात एक सोपी दोन-ओळींची कमांड प्रणाली देखील आहे़ त्यामुळे वापरकर्ते ऐकून आणि टाईप करून विविध भारतीय भाषा सहजपणे लिहू शकतात.
संपूर्णपणे मेड इन इंडिया
या कीबोर्डचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत, भारताला की हार्डवेअर आणि घटकांसाठी १०० टक्के आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. ही परंपरा मोडत, का-नादा फोनेटिक्सने स्वदेशी बनावटीचा कीबाेर्ड विकसित केला आहे. कंपनीने कीबोर्डच्या की असेंब्लीसाठी विशेष रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे़
कंपनीच्या भविष्यातील योजना
बंगळुरू टेक समिटमध्ये जगासमोर कीबोर्ड सादर केल्यानंतर, ही स्टार्टअप कंपनी आपला कीबोर्ड देशाच्या कानाकोपऱ्यात वितरित करण्याची योजना आखत आहे. सर्वसामान्य लोकांनी आणि लहान व्यवसायिकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा, अशी कंपनीची इच्छा आहे. परंतु, हा कीबोर्ड मोठ्या प्रमाणावर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीला सरकारी मदतीचीही गरज आहे.