नवी दिल्ली,
isi-targets-women-indian-youthभारतात आपले हस्तक तयार करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने आता आपली रणनीती बदलली आहे. आतापर्यंत प्रामुख्याने तरुणांना ‘हनीट्रॅप’ मध्ये अडकवणारी आयएसआय आता वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या घटस्फोटित महिला, एकाकीपणाचा सामना करणाऱ्या तरुणी आणि बेरोजगार भारतीय तरुणांना लक्ष्य करत आहे. राजस्थान आणि पंजाब या सीमावर्ती राज्यांतून दोन महिलांना अटक झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात् एनआयएच्या तपासातून समोर आला आहे.
जयपूर येथील बबिता धाकड ऊर्फ खदिजा (वय, ३८) आणि पंजाबमधील गुरुदासपूर येथील महकदीप कौर (वय, २१) अशी अटक करण्यात आलेल्या दोन महिलांची नावे आहेत. पाकिस्तानातून सूत्रे हलवणाऱ्या दहशतवादी हँडलर्सनी सोशल मीडियाद्वारे या दोघींना प्रेम, पैसा आणि नवे आयुष्य सुरू करण्याचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले. मूळची सवाई माधोपूर येथील रहिवासी असलेली बबिता घटस्फोटानंतर जयपूरमध्ये आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होती. बेरोजगारी आणि नैराश्यामुळे तिचा सोशल मीडियावरील वावर वाढला.
याच दरम्यान ती कट्टरतावादी विचारसरणी आणि ‘जैश-ए-मोहम्मद’शी संबंधित एका पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात आली. गेल्या दोन वर्षांत या हँडलरने बबिताची स्तुती करत तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिला ऑनलाइन पद्धतीने ‘कलमा’ पढायला लावून तिचे धर्मांतर केले आणि तिचे नाव ‘खदिजा’ ठेवले. नेपाळ, सौदी अरब किंवा यूएईमार्गे तिला पाकिस्तानात बोलावण्याचे आणि त्यासाठीचा सर्व खर्च क्रिप्टोकरन्सीद्वारे करण्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार बबिताने पासपोर्ट प्रक्रिया ऑनलाइन तपासली होती आणि क्रिप्टो ॲप्सही डाऊनलोड केल्याचे तपासात समोर आले. तिने तीन भारतीय मोबाईल क्रमांकांचे व्हॉट्सॲप ओटीपी जैशच्या एका कमांडरला पुरवले होते.
रेल्वे रूळ उडवण्यासाठी २.८३ लाखांची सुपारी
बबिताचे प्रकरण डिजिटल हेरगिरी आणि कट्टरतावादाशी संबंधित होते, तर महकदीप कौर हिचा वापर थेट घातपाती कृत्यासाठी करण्यात आला. गुरुदासपूर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, घटस्फोटित असलेल्या महकदीपचे उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन नव्हते. ती पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात आली. श्रीगंगानगर जिल्ह्यातील रामसिंगपूर गावाजवळ अनुपगढ-सूरतगढ रेल्वे मार्गावर आयईडी स्फोटके पेरण्यासाठी महकदीपला २.८३ लाख रुपये देण्यात आले. प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि पैशांचे आमिष दाखवून तिला फसवण्यात आले. आयएसआय सध्या हाच पॅटर्न मोठ्या प्रमाणावर वापरत आहे, असे राजस्थान एटीएसचे वरिष्ठ अधिकारी दिनेश एम. एन. यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्रामचा वापर
वैयक्तिक किंवा आर्थिक संकटात असलेल्या महिलांना शोधण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्स इन्स्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपचा वापर करत आहेत. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तपासणी नाक्यांवर तरुणांच्या तुलनेत महिलांची फारशी कसून चौकशी केली जात नाही. त्यामुळे महिला प्रवास करत असल्यास किंवा संशयास्पद हालचाली करत असल्यास त्यांचा लवकर संशय येत नाही. यामुळेच पाकिस्तानी हँडलर्स महिलांना ‘सॉफ्ट टार्गेट’ मानतात.