जमशेदचा पदार्पणातच ऐतिहासिक धमाका!

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
इंदूर,
jamshed-makes-a-historic-splash-on-his-debut टी-२० क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी सलग दोन किंवा तीन चेंडूंवर विकेट मिळवणेही मोठी कामगिरी मानली जाते. मात्र, रेल्वेचा वेगवान गोलंदाज जमशेद आलम याने टी-२० पदार्पणातच असा पराक्रम केला आहे, ज्यामुळे क्रिकेटविश्वाचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध खेळताना त्याने सलग चार चेंडूंवर चार फलंदाजांना बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
 
jamshed-makes-a-historic-splash-on-his-debut
 
२२ नोव्हेंबर रोजी इंदूर येथे झालेल्या या सामन्यात रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत पाच गडी गमावून १८२ धावा उभारल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सौराष्ट्रच्या फलंदाजांना जमशेदच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करता आला नाही. आपल्या पहिल्याच षटकात त्याने प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी अक्षरशः कोलमडून टाकली.
 
सौराष्ट्रच्या डावातील चौथे षटक जमशेदसाठी ऐतिहासिक ठरले. षटकाच्या पहिल्या चार चेंडूंवर त्याने हरविक देसाई, प्रेरक मांकड, रुचित अहिर आणि समर गज्जर यांना बाद केले. यामध्ये दोन फलंदाज यष्टीमागे झेलबाद, एक त्रिफळाचीत आणि एक पायचीत झाला. सलग चार चेंडूंवर चार विकेट मिळवत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये विशेष विक्रमाची नोंद केली.
 
जमशेदचा हा धडाका एवढ्यावरच थांबला नाही. पुढील षटकात त्याने सिद्धार्थ राणाला पायचीत करत पाचवी विकेट मिळवली. विशेष म्हणजे, अवघ्या नऊ चेंडूंमध्ये त्याने पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. पुरुषांच्या टी-२० पदार्पणाच्या सामन्यात पाच बळी घेणारा तो भारताचा सहावा गोलंदाज ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात ३८ धावा देत पाच विकेट मिळवल्या.
 
जमशेदच्या भेदक माऱ्यामुळे सौराष्ट्रची अवस्था एका वेळी ३० धावांत सहा विकेट अशी झाली होती. त्यानंतर संघाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र निर्धारित २० षटकांत त्यांना आठ गडी गमावून केवळ १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी रेल्वेने हा सामना २९ धावांनी जिंकला.
 
टी-२० क्रिकेटमध्ये सलग चार चेंडूंवर चार विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या विशेष यादीत आता जमशेद आलमचा समावेश झाला आहे. त्याच्याआधी कर्नाटकच्या अभिमन्यू मिथुनने नोव्हेंबर २०१९ मध्ये हरियाणाविरुद्ध, तर विदर्भाच्या दर्शन नळकांडेने नोव्हेंबर २०२१ मध्ये कर्नाटकविरुद्ध हा पराक्रम केला होता. विशेष म्हणजे, या दोघांनीही डावाच्या अखेरच्या म्हणजेच २०व्या षटकात सलग चार विकेट घेतल्या होत्या.
 
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्येही अशा प्रकारच्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद झाली आहे. इंडोनेशियाच्या गेडे प्रियंदनाने २०२५ मध्ये कंबोडियाविरुद्ध सहा चेंडूंत पाच विकेट घेतल्या होत्या. तर फिनलंडच्या महेश तांबेने त्याच वर्षी एस्टोनियाविरुद्ध आठ चेंडूंत पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला होता. पदार्पणातच ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या जमशेद आलमने आपल्या गोलंदाजीने क्रिकेटप्रेमींना चकित केले आहे.