मुंबई
maherchi sadi मराठी चित्रपटसृष्टीतील काही चित्रपट काळाच्या ओघातही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहतात. त्यापैकीच एक अजरामर चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. विशेषतः महिलावर्गाने या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला होता. चित्रपटातील पात्रे, त्यांच्यातील नाती आणि भावनिक प्रसंग आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. आता तब्बल अनेक वर्षांनंतर या गाजलेल्या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. अभिनेता अजिंक्य देव यांनी या संभाव्य सिक्वेलमध्ये जुन्या कलाकारांच्या जागी कोणत्या नव्या कलाकारांना पाहायला आवडेल, याबाबत आपली पसंती व्यक्त केली आहे.

‘माहेरची साडी’मध्ये अभिनेत्री अलका कुबल यांनी साकारलेली मुलगी आणि सून आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. तर अभिनेता अजिंक्य देव यांनी विकीची भूमिका साकारली होती. या दोघांसोबतच रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, विक्रम गोखले आणि आशालता वाबगावकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या होत्या. या सर्व कलाकारांच्या अभिनयामुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळाली.
या चित्रपटाची लोकप्रियता किती मोठी होती, याचा प्रत्यय त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळत होता. विशेष म्हणजे, अनेक महिला अक्षरशः ट्रक भरून चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत असत. अलका कुबल यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेमध्ये अनेक महिलांना स्वतःचे प्रतिबिंब दिसत होते. पडद्यावर घडणाऱ्या घटना म्हणजे आपल्या आयुष्यातील वेदना आणि संघर्ष असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळेच ‘माहेरची साडी’ला महिलावर्गाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायमचा कोरला गेला.
दरम्यान, नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजिंक्य देव यांना ‘माहेरची साडी’चा सिक्वेल बनवला तर जुन्या कलाकारांच्या भूमिका नव्या पिढीतील कोणते कलाकार साकारू शकतील, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी काही मनोरंजक नावे सुचवली. विकीच्या भूमिकेसाठी अभिनेता सुबोध भावे योग्य ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. तर अलका कुबल यांनी साकारलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची निवड करायला आवडेल, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटातील खाष्ट सासूची भूमिका उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने विशेष गाजवली होती. या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीची निवड कराल, असे विचारले असता अजिंक्य देव यांनी पुन्हा उषा नाडकर्णी यांचेच नाव घेतले. त्या आजही ही भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकतात. त्यामुळे ही भूमिका त्यांनीच करावी, असे आपल्याला वाटत असल्याचे अजिंक्य देव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या उत्तरामुळे जुन्या कलाकारांना पुन्हा एकदा त्याच भूमिकांमध्ये पाहण्याची चाहत्यांची इच्छा अधोरेखित झाली आहे.मात्र, ‘माहेरची साडी’च्या सिक्वेलबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट प्रत्यक्षात कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, त्याचे कथानक काय असेल आणि नव्या भागात कोणते कलाकार दिसणार, याबाबत सध्या कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. असे असले तरी अजिंक्य देव यांनी सुचवलेली सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची नावे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे ‘माहेरची साडी’चा सिक्वेल खरोखरच बनणार का आणि त्यात जुन्या आठवणींना नव्या कलाकारांची साथ मिळणार का, याकडे मराठी चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.