मुळशीच्या पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
पुणे
mulshi dam water
मुळशी धरणातील पाण्याच्या वाटपावरून आता मुळशीकर आणि पुणेकरांमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळशी तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना धरणातील एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही, असा ठाम इशारा पुणे जिल्हा माजी नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिला आहे. त्यामुळे धरणातील पाणी शहरांना देण्याच्या प्रस्तावावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.



२२ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुळशी धरणातील पाणी पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरांना देण्याबाबत चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगितले जात असले, तरी मुळशीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आधी सोडवावा, अशी मागणी कंधारे यांनी केली आहे. मुळशी धरण तालुक्यात असूनही स्थानिक नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

मुळशी तालुक्यासाठी ५६४ कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना गेल्या चार वर्षांपासून रखडली असल्याचा आरोप कंधारे यांनी केला. केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक परवानगी मिळत नसल्यामुळे ही योजना पुढे सरकलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासन ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागाच्या गरजांना अधिक प्राधान्य देत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुळशीकरांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी यापूर्वी अनेकदा आंदोलने केली असून रस्त्यावर उतरून संघर्षही केला आहे. आगामी काळात स्थानिकांना पाणी न देता ते पुणे आणि पिंपरी-चिंचवडला वळवण्याचा निर्णय घेतल्यास त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुळशीकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत दोन्ही शहरांना पाणी देऊ दिले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, पुणे शहरातही पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थापनावरून महापालिका प्रशासनावर टीका होत आहे. दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवून नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे महापालिकेच्या फुटलेल्या जलवाहिन्यांमधून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत असल्याचा आरोप शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे. नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना जलवाहिन्यांमधून पाणी वाया जाणे ही प्रशासनाची निष्काळजी असल्याचे सांगत, पुणेकरांच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महापालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.