राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
मुंबई
mumbai hosts sailing national championship
मुंबईच्या समुद्रात पार पडलेल्या यॉटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (वायएआय) वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद नौकानयन स्पर्धेचा २० नोव्हेंबर रोजी समारोप झाला. भारतीय नौदलाच्या वॉटरमॅनशिप ट्रेनिंग सेंटरच्या (आयएनडब्ल्यूटीसी) यजमानपदाखाली १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई बंदरातील सनक रॉक आणि प्रॉन्स दीपगृह परिसरात झालेल्या या स्पर्धेत देशातील १७ क्लब आणि विविध संस्थांचे १२१ नौकानयनपटू सहभागी झाले होते. गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक खेळाडूंचा सहभाग असलेली ही स्पर्धा ठरली.



या स्पर्धेत ९४ नौकांसह खेळाडूंनी नऊ प्रकारांत आपले कौशल्य पणाला लावले. पुरुष आणि महिला गटातील आयएलसीए ७ व आयएलसीए ६, मिश्र गटातील ४७०, पुरुष गटातील ४९ईआर, महिला गटातील ४९ईआरएफएक्स, मिश्र गटातील नॅक्रा १७, पुरुष व महिला गटातील आयक्यूफॉइल आणि पुरुष गटातील फॉर्म्युला काइट या प्रकारांचा समावेश होता. समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत पाच दिवसांत एकूण ९१ शर्यती पार पडल्या. अनुभवी शर्यत अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांच्या देखरेखीखाली संपूर्ण स्पर्धा पार पडली.

महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल विद्याधर हरके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयएनडब्ल्यूटीसी येथे पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यांच्या हस्ते विविध प्रकारांतील विजेत्या खेळाडूंना पदके प्रदान करण्यात आली. आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पदकविजेत्या खेळाडूंनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला. लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा आणि २०३० मधील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय नौकानयनपटूंसाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरली.

स्पर्धेतील विविध प्रकारांमध्ये विष्णू सरवणन (आयएलसीए ७), नेहा ठाकूर (आयएलसीए ६), श्रद्धा वर्मा आणि रवींद्रकुमार शर्मा (४७० मिश्र), प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस (४९ईआर), हर्षिता तोमर आणि रितिका दांगी (४९ईआरएफएक्स), दोईफोडे एसआय आणि रम्या सरवणन (नॅक्रा १७), आदित्य सांगवान (आयक्यूफॉइल पुरुष), प्रार्थना भोई (आयक्यूफॉइल महिला) आणि आशिष एस. रॉय (फॉर्म्युला काइट पुरुष) यांनी विजेतेपद पटकावले.

दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या विष्णू सरवणनने आयएलसीए ७ प्रकारात विजेतेपद मिळवित कारकिर्दीतील सातवे राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले. त्यामुळे या स्पर्धेतील त्याची कामगिरी विशेष ठरली.