मुंबईसह कोकण गारठले; तापमानाचा पारा घसरला!

    दिनांक :22-Nov-2026
Total Views |
मुंबई,
mumbai-temperature-dropsराज्यभरातील किमान तापमान शुक्रवारी खाली आले तरी मुंबईकरांना तेवढासा दिलासा मिळाला नव्हता. परंतु, संध्याकाळपासून मुंबईमध्ये गारव्याची जाणीव झाली आणि शनिवारी पहाटे सांताक्रूझ येथे किमान तापमान सरासरीपेक्षा पाच अंशांनी कमी नोंदले गेले. कुलाबा येथे मात्र हा दिलासा मिळायचा बाकी आहे. सांताक्रूझ येथे शनिवारी पहाटे १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईसह कोकणाच्या इतर भागातही किमान तापमानाचा पारा उतरला आहे, तर मध्य महाराष्ट्र अधिक गारठला आहे.
 

maharashtra weather 
सांताक्रूझ येथे १६.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला १६.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. हे तापमान गेल्या ११ वर्षांमधील सर्वांत कमी किमान तापमान होते. सलग दुसऱ्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पारा थंडीची जाणीव करून देण्याइतका खाली आला आहे. सध्या उत्तरेकडून येणारे वारे राज्यात स्थिरावत आहेत. मात्र, याचा फारसा परिणाम कुलाबा येथील किमान तापमानावर झालेला नाही. कुलाबा येथे २१.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद शनिवारी झाली. उपनगरांमध्ये गारवा अनुभवल्यानंतर आता शहरामध्येही गारव्याची जाणीव व्हावी, अशी अपेक्षा मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पण येत्या काही दिवसांमध्ये कुलाबा येथील किमान तापमान २० अंशांच्या खाली जाईल, अशी शक्यता नसल्याचेच चित्र आहे. पुढील शुक्रवारपर्यंतच्या अंदाजानुसार किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यान राहील, अशी शक्यता आहे.
डहाणू येथे १५.६, तर रत्नागिरी येथे १७.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. डहाणू येथे सरासरीपेक्षा ६.१, तर रत्नागिरी येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ४.७ अंशांनी खाली उतरले होते. महाबळेश्वर येथे किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस होते. उत्तर मध्य महाराष्ट्रात पारा आणखी खाली घसरलेला होता. जळगाव येथे ८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा राज्यात सर्वांत कमी म्हणजे ६.८ अंश फरकाने कमी होते, तर नाशिक येथे १० आणि मालेगाव येथे १०.६ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. पुणे येथे ११.२, सातारा येथे १२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. विदर्भ आणि मराठवाडा येथेही किमान तापमानाचा पारा उतरला आहे. विदर्भात यवतमाळ येथे सरासरीहून ५.८ अंशांनी किमान तापमान कमी होते. यवतमाळ येथे ११.२ किमान तापमान नोंदले गेले.